अनोळखीने हॉटेलमधील साहित्यासह बारा एकर ऊसही जाळला; बावची येथील घटना

पोपट पाटील
Monday, 4 January 2021

बावची आष्टा शिवेवरील हॉटेल मैत्री पार्क मधील साहित्यास अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले.

बावची (जि. सांगली) : बावची आष्टा शिवेवरील हॉटेल मैत्री पार्क मधील साहित्यास अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिले. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले.

दरम्यान, रस्त्याच्या उत्तर बाजूच्या शिवारातील ऊस फडासही आग लागल्याने दहा ते बारा एकरांवर ऊस जळून चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. हे जळीताचे कृत्य अनोळखी व्यक्तीकडून रात्री एक ते पहाटे या वेळेत झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हॉटेल मैत्री पार्क चे मालक व कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दहा वाजता बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी तेथील शेतकऱ्यांच्या हॉटेलमधील साहित्य पेटल्याचे निदर्शनास आले. हॉटेल मालकास माहिती दिली.

रात्री एकच्या सुमारास अज्ञाताने हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉटेलमधील दोन गॅस सिलिंडर गायब करण्यात आले होते. त्याने तेथील चिकनवरही ताव मारला व नंतर सीसी टीव्ही कॅमेरा, संगणक, हॉटेलचे साहित्य गॅस कटरच्या सहाय्याने पेटवून दिले. यात अंदाजे एक लाखाचे नुकसान केले आहे. याबाबत हॉटेल मालक प्रदीप यशवंत पाटील यांनी आष्टा पोलिसांत अनोळखी व्यक्‍तीविरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, हॉटेलच्या पूर्व बाजूस कांही अंतरावर असलेल्या चंद्रकांत रकटे यांच्या रसवंती गृहाच्या साहित्याची मोडतोड करून नुकसान केले आहे. 

याशिवाय रस्त्याच्या उत्तर भागातील बावची-आष्टा शिवेवरील शेतातील उसाच्या फडासही अनोळखी व्यक्‍तीने आग लावल्याने 12 एकरांवर ऊस जळाला आहे. या परिसरातील असणारा विद्युत डीपी बंद करून हे कृत्य केले असल्याचे बोलले जात होते. शिवारात लागलेली ही आग रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत धुमसत होती. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The stranger burned twelve acres of sugarcane along with hotel supplies; Incident at Bawchi