फेरीवाल्यांनो, परवाना घ्या...अधिकृत व्यवसायधारक बना

बलराज पवार 
Thursday, 7 January 2021

फेरीवाला धोरणानुसार महापालिकेकडून फेरीवाल्यांना परवाने दिले जाणार आहेत. फेरीवाल्यांनी अधिकृत परवाने काढून घ्यावेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. 

सांगली : फेरीवाला धोरणानुसार महापालिकेकडून फेरीवाल्यांना परवाने दिले जाणार आहेत. फेरीवाल्यांनी अधिकृत परवाने काढून घ्यावेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. 

दयानंद हॉकर्स युनियनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, पृथ्वीराज पवार, नगरसेविका भारती दिगडे, स्वाती शिंदे, ऊर्मिला बेलवलकर, रेखा पाटील, अनिल शेटे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि परवान्याचे वाटप करण्यात आले. 

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, महापालिकेकडून फेरीवाला धोरणाची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात आहे. यामध्ये जे फेरीवाले महापालिकेकडून परवाना घेतील ते अधिकृतपणे व्यवसायधारक बनणार आहेत. याचबरोबर अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांना शासकीय योजना उपलब्ध करून देण्यासाठी परवाना आवश्‍यक आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी अधिकृत परवाने काढून घ्यावेत. त्यांनी महापालिकेशी संपर्क साधून अर्ज दाखल करावेत. त्यांना तत्काळ परवाने देण्याची व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाहीही आयुक्त कापडणीस यांनी यावेळी बोलताना दिली. 

कार्यक्रमाचे आयोजन दयानंद फास्ट फूड संघटनेचे सुरेश टेंगले यांनी केले. यावेळी फास्ट फूड संघटनेकडून महापालिकेच्या पुस्तक बॅंकेसाठी स्पर्धा परीक्षा व अन्य वाचन साहित्याची पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमास फेरीवाले, हातगाडी व फास्ट फूडचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street vendors, get a license ... Become an authorized business owner