रुक्‍मिणीच्या स्वप्नांना नेदरलॅन्डच्या दांम्पत्याचे बळ; डॉक्‍टर होण्यासाठी करतेय जीव तोडून अभ्यास 

जयसिंग कुंभार
Wednesday, 14 October 2020

घरच्यांनी आठवीतच तिचं लग्न उरकायचं ठरलं. मला लग्न करायचं नाही; शिकायचंय असं सांगत तीने शिक्षकांकडे धाव घेतली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करीत तिचं लग्न रोखलं आणि तिचं शिक्षण सुरु झालं.

सांगली ः घरचं अठराविश्‍व दारिद्य्र, घरच्यांनी आठवीतच तिचं लग्न उरकायचं ठरलं. मला लग्न करायचं नाही; शिकायचंय असं सांगत तीने शिक्षकांकडे धाव घेतली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करीत तिचं लग्न रोखलं आणि तिचं शिक्षण सुरु झालं. आता तिला डॉक्‍टर व्हायचंय. तिच्या या स्वप्नपुर्तीसाठी नेदरलॅन्डच्या ड्रीक आणि जोस ड्रॉल या उद्योजक दांम्पत्यानी बळ दिलंय... 

जत तालुक्‍यातील जालीहाळ (बु) मधील रुक्‍मिीणी परशुराम खोत... या मुलीची ही कथा.... जिल्हा परिषद शाळेतून पुढील शिक्षणासाठी आठवीला रुक्‍मिणीने येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्या शाळेत प्रवेश घेतला. तेव्हा शिक्षकांनी तिचं टोपन नाव आश्‍विनी असं केलं. नेदरलॅन्डमध्ये मोठा उद्योग-व्यावसायाचा व्याप असलेले ड्रीक-जोस हे दांम्पत्य येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्या विविध उपक्रमांसाठी भरभरून मदत देत असते.

नेहमीप्रमाणे गेल्यावर्षी ते जत भागात आले होते. "येरळा'च्या जालीहाळच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. त्यादिवशी आश्‍विनीने कानात आकर्षक डुल घातले होते. मुलांमध्ये रमलेल्या आश्‍विनीच्या कानातील या डुलांकडे पाहत जोसबाईंनी तिला "छान' असा रिमार्क दिला. आश्‍विनीनं ते तुम्हाला आवडलंय का... मग घ्या असं म्हणत तिनं कानातून डुल काढून त्यांना देऊन टाकलं. तिच्या या कृतीचं जोसबाईंना खूप कौतुक वाटलं. त्यांनी तिची शिक्षकांकडे चौकशी केली आणि आश्‍विनीच्या आयुष्याचं पान उलगडलं... 

रुक्‍मिणीचं आठवीतच लग्न लावून द्यायचा निर्णय तिच्या आईवडिलांनी घेतला. ती रडतच शाळेत आली. शिक्षकांनी तिच्या आईवडिलांना समजावून सांगितलं. गावपुढाऱ्यांनाही सांगितलं आणि कसबसं वडिलांचं मन वळवलं. त्यानंतर ती सुमारे सात-आठ महिने शाळेच्या वसतीगृहातच रहायला आली. त्यादिवशी तिनं लग्न मोडल्याबद्दल शाळेत मिठाई वाटली. तिची शिकण्याची जिद्द आणि शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे तिनं अभ्यासात चांगलीच गती घेतली. दहावीत 75 टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाली. 

दहावीच्या निरोपसमारंभातील तो प्रसंग तिची उच्चशिक्षणाच्या नव्या संधीची कवाडे खुली करणारा ठरला. ड्रीक आणि जोस दांम्पत्याने तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च यापुढं आपण करू असं जाहीर केलं आणि तिच्यासाठी भविष्यीाल सर्व आर्थिक तरतूद करीत असल्याचे संस्थेला कळवलं... गेली दोन वर्षे हे दांम्पत्य आश्‍विनीला सर्वोतपरी पाठबळ देतंय. गेल्या वर्षी ड्राल दांम्पत जत आले तेव्हा त्यांनी तिच्यासाठी नेदरलॅन्डहून स्मार्ट फोन आणला होता. आता त्या फोनवरून ती आठवड्यातून दोन-तीनदा त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात असते. त्यामुळं आता तिचं इंग्रजीही चांगलं सुधारलं आहे.

या दांम्पत्यानं आता या आपल्या मानस कन्येचं "हनी' असं लाडिवाळ नामकरणही केलंय. तिच्या अभ्यासापासून सर्व काही गोष्टीत ते रस घेतात. तू भरपूर शिक...तुला काहीही कमी पडणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. यंदा ती बारावीला आहे आणि सध्याच्या प्रतिकूल परिस्थिीतीतही ती जिद्दीने डॉक्‍टर व्हायचं म्हणून अभ्यास करतेय. बदल होतो त्यासाठी निरंतर प्रयत्नांची गरज असते. 

बालविवाहाचं प्रमाण मोठं
टाळेबंदीत महाराष्ट्रातील बालविवाहाची टक्केवारी 78 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. बालविवाह का होतात...निरक्षरता, अज्ञान, रुढी-प्रथा, गरीबी अशी अनेक सामाजिक कारणं त्यामागं आहेत. जत तालुक्‍यातही बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे मात्र आमच्या शाळेतील एका मुलीबाबत पालकांनी असा निर्णय घेतला नाही आश्‍विनीसारख्या अनेक मुली आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. हीच इथल्या कामाची पोहच आहे. 
- एन. व्ही. देशपांडे, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The strength of the Dutch couple to Rukmini’s dreams; Studying to become a doctor