गर्दी केल्यास होणार इस्लामपुरात कठोर कारवाई 

धर्मवीर पाटील 
Thursday, 16 July 2020

इस्लामपूर शहरातील विविध ठिकाणी होणारी गर्दी विचारात घेऊन पालिका प्रशासनाने गंभीर कारवाईचा इशारा दिला आहे.

इस्लामपूर : शहरातील विविध ठिकाणी होणारी गर्दी विचारात घेऊन पालिका प्रशासनाने गंभीर कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्षमपणे राबविणे अत्यावश्‍यक आहे, असे सांगत मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांनी कारवाई केली जाईल, असे पत्रक जारी केले आहे. त्या स्वतः शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करीत आहेत आणि नियम न पाळणाऱ्या व्यावसायिक, नागरिकांवर कारवाई केली जात आहे. 

मुख्याधिकारी पवार यांनी म्हटले आहे, की आपल्या व कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी, व्यावसायिक सार्वजनिक जागेमध्ये मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, व्यवसायाच्या ठिकाणी सॅनिटायझर सुविधा उपलब्ध करून देणे, लग्न समारंभ व अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त 50 नागरिक उपस्थित असणे, शहरातील सर्व प्रकारचे कोचींग क्‍लासेस, जीम पूर्णपणे बंद ठेवणे, भाजी व्यापा-यांनी नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या जागेत गर्दी न करता व्यवसाय करणे, व्यवसायांच्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश न देणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करणे अशा सर्व बाबी कायद्यानुसार बंधनकारक आहेत. 

त्याचप्रमाणे उरूण इस्लामपूरमध्ये परगावहून, परराज्य, तसेच परदेशातून येणा-या नागरिकांनी स्वतःहून नगरपालिकेला तसेच पोलीस ठाण्याला कळवणे बंधनकारक आहे. या सर्व आवश्‍यक बाबींचे पालन न केल्याचे आढळून आल्यास नागरी जिवीतास धोका निर्माण केला म्हणून व्यापक नागरी जनहितार्थ आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 

प्राथमिक व नैतिक जबाबदारी...
नागरिकांनी स्वतः, कुटुंबातील वृध्द, लहान मुले, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, अपंग व्यक्तींचे संरक्षण करणे प्राथमिक व नैतिक जबाबदारी आहे. कुटुंबातील अथवा संपर्कातील कोणीही व्यक्ती सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीने व इतर कारणाने आजारी असल्याचे आढळल्यास तातडीने उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय (इस्लामपूर, 02342-223158), शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेडकरनगर येथे संपर्क साधावा.

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action will be taken in Islampur if crowded