इस्लामपूर शहरात सर्वानुमते 10 सप्टेंबरपर्यंत कडकडीत लॉकडाऊन 

पोपट पाटील 
Tuesday, 1 September 2020

इस्लामपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 2 ते 10 सप्टेंबर दरम्यान कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 2 ते 10 सप्टेंबर दरम्यान कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. प्रशासन, व्यापारी व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने व्यापारी व नागरिकांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करत सर्वानुमते कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय झाला. 

येथील राजारामबापू नाट्यगृहात आज सकाळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. कोरोना फैलाव रोखण्यासाठी शहर लॉकडाऊन करण्याची मागणी या बैठकीत नगरसेवकांनी केली. या बैठकीनंतर दुपारी प्रशासनाच्या वतीने दुसरी बैठक झाली. या बैठकीत प्रांताधिकारी नागेश पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक शहाजी पाटील, आनंदराव पवार, विजय पवार यांच्यासह व्यापारी, हॉटेल, कापड दुकानगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, मात्र त्यावर नगरपालिकेचे नियंत्रण असावे, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, शासकीय कार्यालये, बॅंका यांना वेळेचे बंधन असावे, कार्यकर्त्यांनी आपआपल्या प्रभागात लक्ष ठेवावे, रुग्णांची सोय करावी, सामाजिक संस्थांनी उपचार प्रक्रीयेत पुढाकार घ्यावा, हॉटेलसह अन्य क्षेत्रातील मधील कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊमुळे हाल होतात, त्यांची पर्यायी व्यवस्था व्हावी, बाधीत रुग्णांच्या हातावर शिक्के मारावेत, शहराबरोबर आसपासच्या गावातही लॉकडाऊन हवा अशा सुचना केल्या. प्रांताधिकारी नागेश पाटील म्हणाले, "" वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन शहरातील खासगी हॉस्पीटल अधिगृहीत करण्याची प्रक्रीया सुरु आहे. उपलब्ध बेडची संख्या ऑनलाईन प्रसिध्द करीत आहोत. रुग्णवाहिका सेवा एका अधिकाराखाली आणण्याचा विचार आहे. समविचाराने लॉकडाऊन केले पाहिजे. लॉकडाऊमुळे कोरोनाच्या प्रसाराला अटकाव होईल. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, "" लॉकडाऊन काळाची गरज आहे. 23 मार्चला लॉकडाऊनमुळेच आपण कोरोनाचे प्रमाण शुन्यावर आणू शकलो. आताही तीच गरज आहे. मात्र सध्या स्थिती गंभीर आहे. सर्वांनी नियमावलीचे पालन करुन सहकार्य करावे.'' नगरसेवक आनंदराव पवार म्हणाले, "" शहरात दोन ठिकाणी शिवभोजन थाळीची व्यवस्था आहे. आवश्‍यक तेथेही व्यवस्था होईल. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict lockdown till September 10 unanimously in Islampur city