
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन उपाययोजना काटेकोरपणे करीत आहेत.
सांगली : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन उपाययोजना काटेकोरपणे करीत आहेत. सध्या लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्याच्यासाठी 50 लोकांचीच मर्यादेत यापुढे काटेकोरपालन केले जाणार आहे. धार्मिक यात्रा, जत्रा, उरूस कार्यक्रम बंद ठेवून केवळ धार्मिक विधीस परवानगीचे धोरण आहे.
गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंगचे पालन करून लग्न समारंभ, मंगल कार्य करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगल कार्यालयेधारक, केटरिंग असोसिएशन यांच्याशी चर्चा केली. कोरोनाबाबत वेळोवेळीचे आदेशाचे पालनाच्या अटींवर मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रमास परवानगी दिली आहे. लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचे उल्लंघन तसेच खबरदारी यांची तपासणीसाठी प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगल कार्यालयांनी सहकार्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न जाणे यांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य तसेच कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्यासाठी खुली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूसासाठी अर्ज येत आहेत. सद्य:स्थितीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने केवळ धार्मिक विधींना परवानगी देण्यात येणार आहे.
शासकीय पथकांकडून तपासणी
शासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर पथके तयार करून आपल्या कार्यक्षेत्रातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, बाजार, मंडई, रेस्टॉरंट तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी मर्यादित लोकांची उपस्थिती, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर, योग्य सामाजिक अंतर तसेच शासनाने वेळोवेळी संबंधित आस्थापनाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत असल्याबाबतची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.
आठवड्यात सरासरी 11 रुग्ण
गेल्या आठवड्यात सरासरी प्रतिदिन 11 रुग्णांना नव्याने लागण तर 10 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यभर कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची शक्यता मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी स्पष्ट सांगितली आहे.
संपादन : युवराज यादव