विद्यार्थी आधार नोंदणी मुदत 31 मार्चपर्यंत; "कोरोना'मुळे सुरक्षा उपायांसह नोंदणीच्या सूचना

घनशाम नवाथे 
Tuesday, 6 October 2020

राज्यात अद्याप लाखो विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी प्रलंबित आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी 31 मार्च 2021 पूर्वी करावी. पाच वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठसा बायोमेट्रिकद्वारे आधार नोंदणीत अद्ययावत करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.

सांगली : राज्यात अद्याप लाखो विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी प्रलंबित आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी 31 मार्च 2021 पूर्वी करावी. पाच वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठसा बायोमेट्रिकद्वारे आधार नोंदणीत अद्ययावत करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी पर्यायी व्यवस्थेचा वापर करून नोंदणी करावी. केंद्रावर आवश्‍यक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. 

शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना आणि इतर योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकावरून सरल प्रणालीत नोंद केली जाते. राज्यात अजूनही लाखो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत नोंदवले गेले नाहीत. विद्यार्थ्यांची दोनवेळा नोंदणी, चुकीचा आधार क्रमांक असेही प्रकार घडत आहेत. ते रोखण्यासाठी आधार क्रमांकाची खात्री केली जात आहे. 

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आवश्‍यक असल्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात सर्व विभाग, माध्यमांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आवश्‍यक केली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. तरी पर्यायी व्यवस्थेचा वापर करून मार्च 2021 पूर्वी आधार नोंदणी करावी. पाच वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिकद्वारे आधार नोंदणीत अद्यावत करावा अशा सूचना आहेत. 

आधार नोंदणीसाठी तहसील, बॅंक, पोस्ट ऑफिसमध्ये व्यवस्था करावी. आधार नोंदणी व अद्यावत कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सनियंत्रणाखाली प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवली आहे. आधार नोंदणी केंद्रावर सुरक्षित अंतर, 50 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत, असे नियोजन केंद्रप्रमुख किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना आहेत. 

नोंदणीसाठी प्राधान्यक्रम 
आधार नोंदणीसाठी खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित, आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती देणाऱ्या शाळा, आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रम शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय शाळा असा प्राधान्यक्रम ठेवण्याच्या सूचना आहेत.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Aadhaar registration deadline is March 31; Registration instructions with security measures due to "corona"