‘विद्यार्थी दत्तक योजने’स देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

आर्थिक मदतीचे आवाहन
समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, खासगी कंपनी व आस्थापनांनी सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून ‘माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना’ उपक्रमाला आर्थिक मदत करून यात सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. दहा हजार रुपयांची देणगी देऊन एका विद्यार्थ्याचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेता येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व देणगीदारांना ‘कलम ८० जी’नुसार प्राप्तिकरात ५० टक्के सवलत मिळेल. मदतीचे धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या नावाने ‘सकाळ’च्या शिवाजीनगर कार्यालयात रोज सकाळी १०.३० ते ५ या वेळेत (रविवार व सुटीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क - ८६०५०१७३६६

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा
सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ‘सकाळ’ने दिलेल्या हाकेला साद देत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट (पुणे) - २,५०,०००/-, रोहित माडेवार (नागपूर) - ६०,०००/-, नीता तांबोळकर (सोलापूर) - ५१,०००/- , अरविंद जोशी - १०,०००/-, विनायक जोगळेकर - १०,०००/- आणि नितीन सावंत - १०,०००/- (सर्व पुणे); शरद घोडेकर (राजगुरुनगर) - १०,०००/-, सूर्यकांत पाटील (मुंबई) - १०,०००/-, बबन झालाटे (नवी मुंबई) - १०,००१/-  या सर्वांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत मदतीचा धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे दिला.

पतीच्या स्मृतींचे कायम जतन होण्यासाठी सामाजिक भान ठेवून सोलापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नीता तांबोळकर यांनी पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एका संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा सुरू ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. यंदा त्यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला देणगी दिली. यापुढेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या ‘विद्यार्थी दत्तक योजने’ची माहिती वाचण्यात आली. यातून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातात, हे समजले. त्यामुळे यंदाची देणगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिल्याचे तांबोळकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Adopt Scheme Sakal India Foundation Donar Response