ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या...जत तालुक्‍यातील दुर्दैवी घटना 

बादल सर्जे 
Tuesday, 14 July 2020

जत(सांगली)- मल्लाळ (ता. जत) येथे ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाईल मिळत नसल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय 15, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारूती हराळे यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदर्श हराळे हा नुकतेच इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जत शहरातील जत हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता. दहावीमध्ये प्रवेश घेणार होता. "कोरोना' विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे जत तालुक्‍यातील अनेक शाळांमध्ये मोबाईलवरून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तसेच काही क्‍लास चालक देखील ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहे. 

दरम्यान, आदर्श हराळे याने ही वडिलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची मागणी केली होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तसेच मोबाईल घेणे तात्काळ शक्‍य नसल्याने वडील आप्पासाहेब यांनी आदर्शची समजूत काढली. आदर्शने वेळोवेळी मोबाईलची मागणी समजूत केल्यानंतर वडील कशीबशी समजूत काढत होते. सोमवारी आदर्श यांने पुन्हा एकदा वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. वडिलांनी लवकरच घेऊ असे आश्‍वासन दिले. मात्र आदर्श तेवढ्यावर समाधान झाले नाही. तो नाराज झाला. 
मोबाईल मिळत नसल्याच्या नैराश्‍येतून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

सायंकाळी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. आदर्शच्या पश्‍चात आई वडील व लहान भाऊ आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे आदर्शने आत्महत्या केल्याचे समजताच परिसरातील सर्वांनाच धक्का बसला. दुर्दैवी मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जत पोलिस ठाण्यात या दुर्दैवी घटनेची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी बी. डी. भोर तपास करत आहेत. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student commits suicide due to not getting mobile for online education . unfortunate incident in Jat taluka