मित्राकडे जेवण करून घराकडे निघाला अन्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

संत तुकाराम चौक परिसरात मित्राकडे असलेल्या कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते दोघे अशोक चौक परिसरातून दुचाकीवरून घराकडे निघाले होते.

सोलापूर : भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला तरुण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अशोक चौक परिसरातील पोलिस मुख्यालय पेट्रोल पंपाजवळ घडली. संत तुकाराम चौक परिसरात मित्राकडे असलेल्या कार्यक्रमात जेवण करून घराकडे जाताना हा अपघात झाला आहे.

हेही वाचा : सोलापुरात 'या' रस्त्यांवर वाटते महिलांना भीती!

विनय अंबादास नामा (वय 19, रा. गीतानगर, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. राकेश दांडगे (वय 19) असे जखमी तरुणाचे नाव आहे. विनय आणि राकेश दोघे दुचाकीवरून (एमएच 13-सीजी 7141) संत तुकाराम चौक परिसरात मित्राकडे असलेल्या कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते दोघे अशोक चौक परिसरातून दुचाकीवरून घराकडे निघाले होते. विनय हा दुचाकी चालवत होता. रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिस मुख्यालय पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने विनयच्या दुचाकीला मागून धडक दिली. विनयचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याप्रकरणी अज्ञात कार चालकावर जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विनयचे काका अजय वसंत नामा (वय 44, रा. अनुष्का अपार्टमेंट, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student dies in a car crash