esakal | महाविद्यालयात रॅगिंगची विकृती कोण जोपासतंय? 
sakal

बोलून बातमी शोधा

Students or colleges responsible for ragging?

महाविद्यालयात रॅगिंगची विकृती कोण जोपासतंय? 

sakal_logo
By
अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर ः रॅगिंग हा शब्द नवा नाही. यापूर्वी अनेक महाविद्यालयांतून रॅगिंगचे बळी गेलेले आपण पाहिले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमधील निवडणुका बंद केल्या. विद्यार्थी व विद्यार्थिनीचेही आयुष्य अशा प्रकारामुळे उद्‌ध्वस्त झाल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. हे प्रकार होण्यास जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही सापडले नाही. विद्यार्थ्यांमधील दुही, पालकांचे दुर्लक्ष की महाविद्यालयांची अनास्था? नगर जिल्ह्यातील महाविद्यालयात रॅगिंगचा व्हिडिओ नुकताच व्हायरल होऊन या विषयाची पुन्हा चर्चा झाली. रॅगिंगविषयी कायद्याचा धाकच राहिला नसल्याचेच हे उदाहरण ठरले आहे. 

रॅगिंग एक मानसिक विकृती 
रॅगिंग करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्याला वेदना देण्यामुळे आनंद वाटतो. एका आकडेवारीनुसार सुमारे चाळीस टक्के विद्यार्थी सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या रॅगिंगला सामोरे जातात. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत रॅगिंगचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातूनही रॅगिंगचे प्रकार घडत आहेत. मुंबईतील डॉ. पायल तडवी प्रकरणामुळे रॅगिंग हा विषय अधिकच चर्चिला गेला. रॅगिंग झालेली मुले भित्री होतात. तसेच आयुष्यभर त्याची सल त्याच्या मनात राहते. साहजिकच त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होतो. रॅगिंग केवळ विद्यार्थ्यांवरच होते, असे नाही, तर त्याचे प्राध्यापकही बळी पडल्याची उदाहरणे आहेत. डॉ. पायल तडवी प्रकरणात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या डॉ. तडवी यांना वरिष्ठांकडून मानसिक त्रास होत होता. त्याला कंटाळून त्यांनी गळफास जवळ केला होता. त्यामुळे ही मानसिक विकृती समाजातून बाहेर काढली पाहिजे. 

कायदा कडक; पण अंमलबजावणीचे काय? 
रॅगिंगला आळा घालण्यासाठी 15 मे 1999 रोजी एक कायदा अस्तित्वात आला. 1 जून 1999 रोजी या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. रॅगिंगच्या व्याख्येनुसार एखाद्या विद्यार्थ्याला ठरावीक गोष्ट करण्यास भाग पाडणे, की तो विद्यार्थी ती करण्यास तयार नसेल, तरीही बळजबरीने ती करण्यास सांगणे. त्यासाठी इतर विद्यार्थ्यांकडून बळाचा वापर करणे. असा गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तींना तुरुंगवास व दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे असे प्रकार घडल्यास संबंधित पालक, प्राध्यापक, संस्थाचालकांनी व मित्र परिवाराने या प्रकाराची तक्रार थेट पोलिसांत द्यायला पाहिजे. छळाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्याने तक्रार केली, तर योग्यच. हे सर्व वेळ न दवडता केले, तरच होत असते. असे झाले तरच संबंधित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रवासाला काही प्रमाणात आळा बसू शकतो. अन्यथा असे प्रकार सध्या दडपले जातील; परंतु पुन्हा संबंधित विद्यार्थ्याला त्याचा मनस्ताप ठरलेला असतो. त्यामुळे अशा घटनांच्या प्रसंगी कायदेशीर मार्गाने जाणे हेच योग्य असते. परंतु दुर्दैव असे की बहुतेक रॅगिंगचे प्रकार दडपले जातात. संबंधित संस्थाचालक, प्राध्यापक व रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा समूह हे आर्थिक तडजोडी करून बदनामी टाळतात. रॅगिंगला बळी पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची समजूत घालून असे प्रकार दडपले गेले, तर भविष्यात संबंधित बळी पडलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालय सोडणे, शहर सोडणे अशा घटनांना सामोरे जावे लागते. कारण नंतरही त्यावर अप्रत्यक्षरीत्या शाब्दिक रॅगिंग होतच असते. 2011मध्ये रॅगिंग एक विकृती हा चित्रपटही प्रसारित झाला होता. त्यामध्येही याचे वास्तव दाखविण्यात आले आहे. 

महाविद्यालयाचे प्रशासन काय करते? 
शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना छडी द्यायचीच नाही, असाच फंडा सध्या वापरला जात आहे. पालकांकडे संबंधित विद्यार्थ्याने तक्रार केल्यास संबंधित शिक्षकाला मार खावा लागतो. शिवाय प्रसंगी निलंबनासारख्या कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्वच प्राध्यापक सध्या केवळ आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. विद्यार्थी कसा अभ्यास करतो, यापेक्षा आपली नोकरी कशी सांभाळता येईल, याचीच संबंधितांना भीती असते. त्यामुळे छडी देण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही. साहजिकच विद्यार्थ्यांना धाक नावाचा प्रकारच राहिला नाही.

आधीच पालकांचे विद्यार्थी ऐकत नाही. पालकांचा धाक केव्हाच गेला आहे. आता शिक्षकांचाही धाक नसल्याने विद्यार्थी वाटेल ते करण्यास तयार होतो. बहुतेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांवर प्रशासनाचा वचक नसतो. बाहेरील विद्यार्थी महाविद्यालयात येऊन दंगामस्ती करतात. वर्गात वाढदिवस साजरा करताना धिंगाणा घालतात. एकमेकांना छेडाछेडीचे प्रकार करतात. अशा वेळी महाविद्यालयाचे प्रशासन काय करते. वर्गात ठरलेल्या वेळी संबंधित प्राध्यापक तासाला कशी काय दांडी मारतात? वर्गात कोणत्या वेळी रॅगिंग झाले, याची शहानिशा होते काय? एखाद्या विषयाच्या तासाच्या वेळी रॅगिंग होत असेल, तर संबंधित तास का झाले नाहीत, अशा प्रकारची चौकशी झाल्याचे ऐकिवात नाही. उलट सुटीच्या वेळेतच किंवा महाविद्यालयाच्या बाहेर रॅगिंग झाल्याचे कबुलीजबाब घेऊन महाविद्यालये हात झटकतात, हेच मोठे दुर्दैव आहे. 

काय कराल उपाययोजना... 
प्रत्येक महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ज्या ठिकाणी नसतील, तेथे ते आवर्जून बसवायला हवेत. त्या कॅमेऱ्यांवर कोणाची तरी कायम नजर असायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये काही गडबड दिसल्यास तातडीने तेथे प्राध्यापकाने जाऊन ते रोखले पाहिजे. अशा कारवाया सुरू झाल्यास मुलांमध्येही एकप्रकारे कॅमेऱ्याचा धाक राहील. रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रकरण कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता पोलिसांत नेले पाहिजे. संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षाही झाली पाहिजे, तरच अत्याचारित विद्यार्थी मानसिकदृष्ट्या संतुष्ट राहील; अन्यथा आगामी काळातही पुन्हा रॅगिंग होऊन तो बळी ठरू शकतो.

बाहेरील राजकीय पक्षाच्या शाखा महाविद्यालयाच्या आवारात नको किंवा अशा कार्यकर्त्यांच्या हालचालींवर महाविद्यालयाच्या प्रशासनाचे लक्ष असायला हवे. बाहेरील विद्यार्थ्यास महाविद्यालयात प्रवेश कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. नवीन विद्यार्थ्याची चौकशी होऊन त्याची नोंद महाविद्यालयाच्या दफ्तरी होणे आवश्‍यक आहे. तसे काही प्रकार आढळल्यास पालकांच्या कानावर ही गोष्ट जायला हवी. एकमेकांची खुन्नस काढण्याचे प्रकार होत असल्यास त्यास तातडीने आळा बसवायला हवा. अशा काही उपाययोजना रॅगिंग थांबवू शकतील, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचे करिअर, आयुष्य वाचवू शकतील. 
 

loading image