ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी वाट चालावी : रवींद्र रांजणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

भारतरत्न सर विश्वेश्‍वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे साजरा करण्यात आला.

सातारा ः अभियंता आपल्या ज्ञानाने जग बदलू शकतो. आज कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे मत बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन आणि टेक्‍नालॉजी प्रा. लि. मुंबईचे सिनियर प्रोजेक्‍ट मॅनेजर रवींद्र रांजणे यांनी व्यक्त केले. 

भारतरत्न सर विश्वेश्‍वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात श्री. रांजणे बोलत होते. या वेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य के. एस. शेख, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सातारा शाखेचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव श्रीराज दीक्षित, उपाध्यक्ष अनुप शिंदे, खजिनदार साहिल शेख, इतर पदाधिकारी, सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी श्री. रांजणे यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. उद्याच्या भारत घडवणाऱ्या पिढीने राष्ट्र उभारणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्योगात अथवा नोकरीत यावे, असेही त्यांनी सांगितले. 

या वेळी असोसिएशनतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन कॉलेजला बेस्ट पॉलिटेक्‍निक कॉलेज ऍवार्ड देऊन गौरविण्यात आले, तसेच इंजिनिअरिंग व पॉलिटेक्‍निक विभागातील सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या वेळी करण्यात आला. अध्यक्ष श्री. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सेक्रेटरी श्री. दीक्षित यांनी आभार मानले. वळसे येथील एहसास मतिमंद स्कूल, आनंदविहार वृद्धाश्रम या संस्थांना जीवनावश्‍यक वस्तू बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आल्या. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा 30 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students should keep the goal: Ravindra Ranjane