निवडणूक रणधुमाळीत विद्यार्थी गुंतणार विद्यापीठाच्या परीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

विद्यार्थी परीक्षेत व अभ्यासात गुंतणार असल्याचा फटका सहाजिक नेत्यांच्या सभांच्या गर्दीवर होणार असून, प्रचारासाठी महाविद्यालयीन युवकांना मुकावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यावर नेते मंडळी गर्दी जमवण्यासाठी काय पर्याय काढणार? याकडे लक्ष लागून आहे. 

कऱ्हाड ः विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण "इलेक्‍शनमय' झाले आहे. या निवडणुकांच्या प्रचार सभा आणि रॅलीतील केंद्रबिंदू ठरणारे महाविद्यालयीन युवक मात्र परीक्षेत गुंतणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होत असल्याने प्रचार सभा, रॅलीतील महाविद्यालयीन युवकांच्या सहभागावर मर्यादा येणार आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. या शक्तिप्रदर्शनासाठी शहरात गावोगावचे कार्यकर्ते वाहने भरून येत आहेत. त्यामध्ये युवकांचाही सहभाग लक्षणीय आहे.

सोमवारी (ता. सात) अर्ज माघारीनंतर प्रचारसभा, रॅलींना जोर येणार आहे. त्यात उमेदवारांना शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू असणारा युवक यावेळी परीक्षेच्या फेऱ्यात अडकणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा सहामाही पध्दतीने सुरू झाल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळीपूर्वी घेण्याचे नियोजन शिवाजी विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे पहिल्या वर्षाच्या परीक्षांना 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होत आहे. त्यामुळे ऐन प्रचारसभा व निवडणूक रॅलीच्या दरम्यान विद्यार्थी परीक्षा व अभ्यासात मग्न राहणार असल्याने सहाजिकच प्रचारातील त्यांच्या सहभागावर मर्यादा येणार आहे. 

कऱ्हाडमध्ये रयत शिक्षण संस्थेचे सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालय स्वायत्त झाल्याने त्यांच्याकडूनही सहामाहीच्या सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्वायत्त संस्थेतही 15 ऑक्‍टोबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यापीठासोबत स्वायत्त संस्थेतील विद्यार्थीही परीक्षेत व अभ्यासात गुंतणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students will be involved in election rigging in university examination