सांगली महापालिकेत ठेच, झेडपीला शहाणपण; भाजपची झाली अडचण

अजित झळके
Tuesday, 23 February 2021

जिल्हा परिषदेतील बलाबल भाजपसाठी शंभर टक्के अडचणीचे ठरू शकते, याबाबत याघडीला तरी कुणाच्या मनात शंका नाही. भाजपकडे 26, शिवसेनेचे 3, रयत आघाडीचे 4, घोरपडे गटाचे 2 असे सध्याचे संख्याबळ आहे. कॉंग्रेसकडे 8, राष्ट्रवादीकडे 14 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 सदस्य आहे.

सांगली ः भाजपची पूर्ण सत्ता असलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने दणका देत महापौर पद आपल्याकडे खेचत सत्तापालट केली. त्यामुळे आता कुबड्यांसह सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचा मटका भाजप खेळण्याची शक्‍यता आता जवळपास संपली आहे. महापालिकेत ठेच लागल्याने झेडपीत शहाणपणा दाखवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह सभापतींचे चेहरे खुलले आहेत. 

जिल्हा परिषदेत भाजप, शिवसेना, रयत विकास आघाडी आणि अजितराव घोरपडे गट यांची एकत्रित सत्ता आहे. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि महिला व बालकल्याण सभापती सुनिता पवार हे भाजपचे आहेत. सभापती आशा पाटील या घोरपडे गटाच्या, प्रमोद शेंडगे अपक्ष असून संजयकाका समर्थक तर जगन्नाथ माळी हे महाडिक गटाचे अर्थात रयत आघाडीचे आहेत. शिवसेनेच्या बाबर गटाने गेल्यावेळी निवडीत पाठींबा दिला होता, मात्र पद घेतले नव्हते. आता जिल्हा परिषदेची निवडणूक एक वर्षावर आली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोरात आहे. आरग येथील सरिता कोरबू यांच्या गटाने त्यासाठी ताकद लावली आहे. त्यांना अध्यक्षपद हवे आहे. त्यासाठी सतरा सदस्यांचे पत्र घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली. त्यांनी महापौर निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी भेटू, असे सांगितले होते. आता महापौर निवडीत जे काही झाले, ते पाहता ही भेट होईल, असे चिन्ह नाही. 

जिल्हा परिषदेतील बलाबल भाजपसाठी शंभर टक्के अडचणीचे ठरू शकते, याबाबत याघडीला तरी कुणाच्या मनात शंका नाही. भाजपकडे 26, शिवसेनेचे 3, रयत आघाडीचे 4, घोरपडे गटाचे 2 असे सध्याचे संख्याबळ आहे. कॉंग्रेसकडे 8, राष्ट्रवादीकडे 14 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 सदस्य आहे. येथे महाविकास आघाडीचा प्रयोग झाला सगळे गणितच बिघडू शकते. त्यामुळे भाजप आता मटका खेळण्याची चिन्हे नाहीत. हातात असलेले जिल्ह्यातील आता एकमेव मोठे सत्ताकेंद्र सोडण्याची शक्‍यता धुसर झाली आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपला दणका बसला असला तरी जिल्हा परिषदेत बदलासाठी हट्टाला पेटलेले चेहरे हिरमुसले आहेत. 
--------- 
 

आधी तसे झाले, आता असे 

भाजपच्या सत्ताकाळातील पहिल्या अडीच वर्षात संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष होते. सव्वा वर्षाने त्यांना बदलावे, अशा मागणीसाठी बंडाचे झेंडे फडकले. त्यावेळी देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची असल्याने त्यांना जास्तीचे संधी देण्यात आली. परिणामी, अनेकांना हिरमोड झाला. आता कोरे यांच्यानंतर अध्यक्षपदासाठी कोरबू इच्छुक आहेत. उपाध्यक्ष, सभापती व्हायला डझनभरांनी नंबर लावला आहे. ते सारे नाराज आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stumbling in Sangli Municipal Corporation, wisdom to ZP