Success Story : सांगलीचा शेतकरी एक एकराच्या जागेत घेतोय १३० टन ऊसाचे उत्पन्न ; सध्या कमावतोय लाखांमध्ये

स्नेहल कदम
Wednesday, 30 December 2020

कधीकाळी चाळीस-पन्नास टनापर्यंत असणारे उत्पादन आता 130 टनापर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

सांगली : उसाचे उत्पादन आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मिळत जुळत गणित. सहकाराचा पगडा असलेल्या या भागातलं राजकारण आणि अर्थकारण हे उसावर चालते. सांगलीच्या प्रयोगशील शेतकरी अमर पाटील यांनी अशाचप्रकारे एक एकर शेतीत 130 टन उसाचे पीक घेतले आहे. तंत्रज्ञानाचे योग्य व्यवस्थापन आणि चिकाटीने त्यांनी या शेतीत मास्टरकी मिळवली आहे. कधीकाळी चाळीस-पन्नास टनापर्यंत असणारे उत्पादन आता 130 टनापर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

अमर पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या एकत्रित कुटुंबात एकूण 38 एकर शेती आहे. पूर्वीच्या काळात कोरडवाहू असलेले हे गाव सिंचन योजनेमुळे अलिकडच्या काळात बागायत बनले आहे. पाटील यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर शेतीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. पडीक जमिनीवर वेगवेगळे प्रयोग करून त्या लागवडीखाली आणल्या. शेती भागात पाण्याचे स्त्रोत वाढवले. पाईपलाईन, ठिबक सिंचन यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली आणि ऊस शेतीला सुरुवात झाली. 

हेही वाचा - दुर्दैव! बापाच्या निधनानंतर दोन वर्षातच मुलाचा अपघाती मृत्यू -

सुरुवातीला एकरी 30 ते 40 टन ऊस पिकत होता. त्यानंतर त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करणे सुरू केले. जसे प्रयोग वाढले, तसे एकरी 50 ते 65 पुढे 90 ते 95 टक्के आणि अलीकडे हेच उत्पादन एकरी 130 टनापर्यंत पोहोचले आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना उसाचे पाचट आणि इतर पालापाचोळा नवीन पिकासाठी वापरला तर उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मातीचा पोत कसा सुधारावा यावर अभ्यास केला.

अमर नेहमी शेतात ऊसाचा खोडवा ठेवतात. एकदा ऊस तुटल्यानंतर परत ऊस लावत नाहीत तर त्यावर हळद किंवा रताळाचे पीक घेतात. हे करत असताना एकरी 25 टन कंपोस्ट विस्कटले जाते. तीन टन कोंबडी खत आणि दोन टन कारखान्याची राख विस्कटले जाते. पुन्हा नांगरणी आणि सरी करून रान तापवले जाते. खतांचे योग्य व्यवस्थापन करून नत्र, स्फुरद, पालाश आणि विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर करून उसाची लागवड केली जाते. 

हेही वाचा -  इंटरमिजिएट, एलिमेंटरी परीक्षेबाबत संभ्रम

ऊस शेतीतील धडपड, प्रयत्न, आणि नविन प्रयोग यांची दखल घेत त्यांना अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. यासाठी विविध मार्गदर्शक आणि विकसनशील शेतकरी सहकाऱ्यांचे मला मार्गदर्शन मिळाले आहे असे ते आवर्जून सांगतात. सध्या तरी यावर्षी त्यांनी एकरी 151 टन उत्पादन घेण्याचे ध्येय ठेवून त्याप्रमाणे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the success story of amra patil farer of sangli one acre farming 130 tun sugercane production in sangli