आटपाडी तालुक्‍यात येथे शेवग्याची यशस्वी सामुदायिक शेती...पन्नास शेतकऱ्याची शंभर एकरांवर बारमाही शेवगा लागवड  

नागेश गायकवाड
Wednesday, 8 July 2020

आटपाडी (सांगली)-  शेटफळे (ता.आटपाडी) आणि परिसरातील पन्नासवर शेतकरी गेली तीन वर्षे एकत्र येऊ शेवग्याचे मोठे उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी शेवगा उत्पादनात हातखंडाच मिळवला आहे. त्यामुळे त्यांना शेवगा शेतीचा लळाच लागला आहे. 

आटपाडी (सांगली)-  शेटफळे (ता.आटपाडी) आणि परिसरातील पन्नासवर शेतकरी गेली तीन वर्षे एकत्र येऊ शेवग्याचे मोठे उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी शेवगा उत्पादनात हातखंडाच मिळवला आहे. त्यामुळे त्यांना शेवगा शेतीचा लळाच लागला आहे. 

शेवगा दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे पिक आहे.पण याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक गैरसमज आहेत. शेतकरी शेवग्याला ज्यादा पाणी सोडतात परिणामी यश येत नाही. झाडाच्या गरजेनुसार माफक पाणी,छाटणी, ताण देणे या गोष्टी सांभाळल्या तर शेवग्यापासून बारा महिने उत्पादन मिळते ते शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेटफळे येथील संजय गायकवाड गेल्या तीन वर्षापासून शेवग्याची शेती करतात. त्यानी सांगोला तालुक्‍यातील एका डॉक्‍टर शेतकऱ्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतले. शेटफळे, कोळा, तळेवाडी, नागज या गावासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पन्नासवर शेतकऱ्यांचा शेवगा शेतीचा ग्रुप बनला आहे. ते तीन वर्षे शेवग्याचे नियमित उत्पादन घेतात. स्वतः संजय गायकवाड यांचा चार एकर शेवगा तीन वर्षापासून आहे. त्यांनी स्वतः वसंत वाण विकसित केला आहे.

शेवग्याचे अवघ्या चार महिन्यात उत्पादन सुरू होते. दीड फुटावर शेंडा खुडणे, त्यानंतर येणाऱ्या फुटांची योग्य छाटणी, गरजेनुसार पाणी, फवारणी हे शेवगा शेतीचे गमक ठरले आहे. या शेतकऱ्यांचा शेवगा कोल्हापूर, सोलापूर,सातारा, पुणे या भागात एकत्र वाहनातून विक्रीसाठी पाठवला जातो. सर्वांचा माल एकाच वेळी जास्त असल्यामुळे भावही चांगला मिळतो. तसेच वाहतुकीचा खर्च कमी होतो. पन्नास शेतकऱ्याची शंभर एकर क्षेत्रावर बारमाही शेवग्याची लागवड असते. दर दोन दिवसाला शेवग्याची तोडणी करून बाजारपेठेत पाठवला जातो. एकावेळी तीन ते सहा टन माल एकत्र जातो. कमीत कमी दहा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत प्रति किलो भाव मिळाला आहे. सरासरी पंचवीस ते तीस रुपये प्रति किलोने शेवग्याची विक्री होते. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एकाच वसंत वाणाची लागवड केली आहे. याची शेंग मध्यम लांब, आणि जाड, आकर्षक रंग असल्यामुळे बाजारपेठेत उठाव होतो. एक वर्षानंतर शेवग्याची विशिष्ट पद्धतीने छाटणी केली जाते. दर कोसळलेल्या काळात शेंगाची विक्री न करता बियाण्यासाठी ठेवले जाते. त्याचीही प्रतिकिलो दोन हजार रुपये दराने विक्री केली जाते. शिवाय शेवग्याच्या बिया पासून तेलाची निर्मिती केली जाते. त्यासाठी ही मोठी मागणी आहे. 

शेवगा शेती मध्ये पाण्याचे आणि शेंडा खोडणे याचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे. यामुळेच आम्ही पन्नास शेतकरी यशस्वी झालो आहोत. अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही केले. 
- संजय गायकवाड (शेवगा उत्पादक शेतकरी शेटफळे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful Community Farming of Shewaga in Atpadi Taluka