व्हिएतनामवर सांगलीची मात; साडेपाचशे एकरांमध्ये ड्रॅगनची क्रांती

व्हिएतनामवर सांगलीची मात; साडेपाचशे एकरांमध्ये ड्रॅगनची क्रांती

सांगली : सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात द्राक्षक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजघडीला जिल्ह्यात द्राक्ष पिकाची वार्षिक उलाढाल सात हजार कोटींवर पोहचली आहे. या द्राक्ष क्रांतीनंतर डाळिंब, बोर, सीताफळ अशा पिकांनी दुष्काळी भागाच्या अर्थकारणाला गती दिली. आता या फळक्रांतीत २०१४ पासून ‘गुंजाली’ अर्थात ‘ड्रॅगन फ्रूट’ची भर पडली आहे. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतील सुमारे साडेपाचशे एकरांमध्ये ड्रॅगनची लागवड झाली असून, दरवर्षी या पिकाचे क्षेत्र वाढतच असून यंदा या फळपिकाद्वारे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या खिशात सुमारे आठ कोटी रुपये पडतील. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातून दुबईला या फळाची निर्यात झाली. ही जिल्ह्यातील ड्रॅगन क्रांतीची सुरवात आहे. आता याला योग्य दिशा देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वित्तीय संस्थांनी पुढे आले पाहिजे.(successfully-dragon-fruit-cultivated-by-farming-in-sangli-marathi-news)

- जयसिंग कुंभार jaysingkumbhar.sakal@gmail.com

साडेपाचशे एकरांवर लागवड

कमीत कमी पाण्यात, ओसाड फोंड्या माळावर, कमीत कमी देखभाल खर्चात येणारे जत तालुक्यासाठी कोणते पीक असू शकेल याच्या शोधात या भागात काम करणाऱ्या येरळा प्रोजेक्ट सोसायटीने २०१४ मध्ये पहिल्यांदा जिल्ह्यात ‘ड्रॅगन’ची लागवड केली. त्याआधी हे पीक देशाच्या कानाकोपऱ्यात या पिकाची प्रयोगाच्या पातळीवरच लागवड होती. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च संस्थेने प्रसिद्ध केलेल्या डिसेंबर २०२० मधील बुलेटिनमधील आकडेवारीनुसार व्हिएतनाममध्ये ५५ हजार ४१९ हेक्टर इतके या फळाचे लागवड क्षेत्र आहे. त्यावेळी भारतात ४०० हेक्टर इतके क्षेत्र आहे.

भारतातील एकूण उत्पन्न ४ हजार २०० टन इतके होते. अर्थात जिल्हास्तरावरील येरळाने केलेल्या नोंदीनुसार आजघडीला केवळ जत तालुक्यात सव्वाशे हेक्टर म्हणजे सुमारे २५० एकर इतके ड्रॅगन फळाचे क्षेत्र आहे. ही लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील १७५ उत्पादक शेतकऱ्यांची नोंद ‘येरळा़’कडे आहे. त्यांच्याकडून अवघ्या सहा वर्षांत प्रति वर्षी सुमारे नऊशे टन फळे बाजारपेठेत पाठवली जात आहेत. सांगलीसह, बंगळूर, विजापूर, गोवा, सोलापूर या बाजारपेठेत सांगलीची फळे आता रोज जात आहेत. यावर्षी प्रथमच दुबईमध्ये तडसरच्या आनंदराव पवार यांनी शंभर किलो फळे पाठवली. ही सारी वाटचाल सांगली जिल्ह्यासाठी समृद्धीचे आणखी एक दार खुले करणारी आहे.

व्हिएतनामवर सांगलीची मात

जागतिक स्तरावर व्हिएतनामचा या फळात दबदबा आहे. चीनमध्येही त्यांच्यापेक्षा कमी म्हणजे ४० हजार हेक्टर इतके ड्रॅगनचे क्षेत्र आहे. भारतात हे फळ व्हिएतनाममधून येते. मात्र त्याची तुरट अशी चव आहे. सुरवातीच्या काळात या चवीमुळे भारतीयांनी या फळाला फारशी पसंती दिली नाही. मात्र जसजशी भारतात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात या फळाची वेगाने लागवड झाल्यानंतर या फळाने व्हिएतनाममधून आयात फळाला मधुर गोड चवीच्या जोरदार टक्कर देत बाजारपेठ काबीज केली आहे. गेल्या तीन वर्षात देशभरातील प्रमुख बाजारपेठांमधून सांगली-सोलापूरच्या फळांना मागणी येत आहे. भारतीय फळांचा हंगाम जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हंगाम असतो. याच हंगामातील फळे खावीत. आता इथल्या ड्रॅगनची चव आता भारतीयांच्या जिभेला रुचत आहे. त्यामुळे व्हिएतनामच्या तुरट चवीमुळे या फळाबद्दल झालेला नकारात्मक दृष्टिकोन बाजूला पडत असून येत्या काही वर्षात हे फळ त्याच्या चव आणि पोषणमूल्यांमुळे झपाट्याने लोकप्रिय झालेले असेल, यात शंका उरलेली नाही.

या फळ पिकासाठी भारतीय नाव असावे यासाठी आम्ही ‘गुंजाली’ हे नाव सुचवले आहे. आता त्याला भारतभरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ड्रॅगन फ्रूट (आयडीएफ) नावाने ब्रँडिंग सुरू आहे. त्यासाठी ‘आयडीएफ ग्रोअर्स ग्रुप’ नावाने लवकरच संकेतस्थळ सुरू होत आहे. ज्यामध्ये उत्पादकांची इत्यंभूत माहिती असेल. ही वेबसाईट व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील ती दुवा असेल.’’

- एन. व्ही. देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्ट सोसायटी

द्राक्ष पीकासाठी कर्ज पुरवठा करण्याचा धाडसी निर्णय जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी घेतला होता. या फळाला शासनस्तरावर मान्यता नाही. मात्र, आम्ही जिल्ह्याची गरज ओळखून लवकरच या फळ लागवडीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेऊ. त्यासाठी यंदाच्या हंगामात बँकेच्या अधिकाऱ्यांचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेईल. त्यांचा अहवाल सादर होताच याबाबतचा निर्णय होईल.

- दिलीप पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा सहकारी बँक

ड्रॅगन फ्रूटला कृषी विभागाकडून कोणतीच योजना म्हणून मान्यता नाही. गुजरात सरकारने दोन वर्षांपासून या लागवडीसाठी अनुदान दिले आहे. तेथे कर्जपुरवठा होतो. आपल्याकडेही जिल्हा बँकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्याच्या कृषी विभागाने या फळ पिकाचा अनुदान योजनेत समावेश करावा. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांमधून वित्तीय पुरवठा सुलभ होईल.

- आनंदराव पवार, शेतकरी तडसर (ता. खानापूर),

- मुकुंद वेळापूरकर, जालीहाळ (ता. जत)

जिल्हा बँकेकडून वित्तपुरवठा व्हावा, यासाठी मी तत्काळ प्रयत्न करेन. शासनस्तरावरही या फळाचा अनुदान योजनेत समावेश व्हावा, यासाठी माझे प्रयत्न असतील.

- विक्रम सावंत, आमदार, जत विधानसभा मतदारसंघ

जत येथे कृषी प्रदर्शनावेळी कृषी मंत्री महोदयांना ड्रॅगन पिकाबाबत निवेदन करण्यात आले होते. हे फळपीक कमी पाण्यावर तयार होणारे असून त्याचा दुष्काळी तालुक्यांना नक्की लाभ होईल.

- बसवराज मास्तोळी, अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

ड्रॅगन फ्रूटमधील पोषक तत्त्वे :

ऊर्जा (कि.कॅ)

२३६

प्रथिने (ग्रॅ) ३

स्निग्ध पदार्थ(ग्रॅ)

१.३

तंतुमय पदार्थ (ग्रॅ) ७.०

कर्बोदके (ग्रॅ) २९.०

खनिजद्रव्ये (ग्रॅ) ५

कॅल्शिमअम (मि.ग्रॅ) १२०

लोह (मि.ग्रॅ) ८

मॅग्नेशिअम (मि.ग्रॅ) १८०

सोडिअम (मि.ग्रॅ) ६

फॉलिक ॲसिड

(मि.ग्रॅ) १८.३

विटामिन इ (%) ४

विटामिन सी (%) ९

संदर्भ: राष्ट्रीय पोषण संस्थान (NIN) हैदराबाद)

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे द्वार

सहाव्या वर्षी सुमारे आठ कोटींची उलाढाल

साडेपाचशे एकरांवर पोहोचली लागवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com