शेतकरी संघटनेने रोखली उसतोड; वड्डी येथील प्रकार, कर्नाटकातील कारखान्याला जाणार होता ऊस

प्रमोद जेरे
Sunday, 18 October 2020

कोणताही गाळप परवाना नसताना तसेच उसाच्या दराबाबत अधिकृत घोषणा झालेली नसताना कर्नाटकातील एका कारखान्याने तालुक्‍यातील वड्डी येथे एका शेतकऱ्याचा ऊस नेण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

मिरज (जि. सांगली) : कोणताही गाळप परवाना नसताना तसेच उसाच्या दराबाबत अधिकृत घोषणा झालेली नसताना कर्नाटकातील एका कारखान्याने तालुक्‍यातील वड्डी येथे एका शेतकऱ्याचा ऊस नेण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. थेट फडात जाऊन ऊसतोड कामगार वाहतूकदार उसाच्या फडातून पिटाळून लावले आणि ही तोड बंद पाडली. सांगली जिल्ह्यातील ही ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांमधील यावर्षीच्या सिझनमधील संघर्षाची पहिली ठिणगी आहे. 

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेव कोरे यांच्यासह सोबतच्या कार्यकर्त्यांनी ही तोड रोखून यापुढे साखर कारखानदारांची गुंडगिरी चालू देणार नाही असाही इशारा दिला. जोपर्यंत उसाचा दर आणि त्या बाबतचे धोरण अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत साखर कारखानदारांनी उसाच्या फडात पाऊल टाकायचे नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटकातील साखर कारखान्यांनी प्रति टन चार हजार रुपये फडात रोख द्यावेत आणि त्यानंतरच उसाच्या फडाला हात लावावा असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांकडे त्यांनी चौकशी केली असता त्यांच्याशीही तोडणी आणि वाहतुकीचे दर वाढवण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितल्यानंतर आमची तोडणी आणि वाहतूक दारालाही दर वाढवून देण्याची मागणी असल्याचे कोरे यांनी सांगितले.

या आंदोलनात कमलेश्वर कांबळे, प्रदीप कार्वेकर, मारुती माळी, संजय कांबळे, मिलिंद खाडिलकर,शशिकांत गायकवाड,अरुण क्षिरसागर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane cutting stopped by farmers' association at Waddi; Sugarcane was going to a factory in Karnataka