पाऊस व टेंभूचे पाण्यामुळे हजार हेक्‍टरने ऊस श्रेत्र वाढले 

दिलीप कोळी
Saturday, 12 December 2020

विटा : यावर्षी झालेला जोरदार पाऊस व टेंभूचे पाण्यामुळे ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी तीन हजार नऊशे बाहत्तर हेक्‍टर ऊसाची नोंद आहे. त्यात यंदा एक हजार तीनशे हेक्‍टरने वाढ झाली आहे.

विटा : यावर्षी झालेला जोरदार पाऊस व टेंभूचे पाण्यामुळे ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी तीन हजार नऊशे बाहत्तर हेक्‍टर ऊसाची नोंद आहे. त्यात यंदा एक हजार तीनशे हेक्‍टरने वाढ झाली आहे. एकूण क्षेत्र पाच हजार तीनशे हेक्‍टर झाले आहे. रब्बीत गव्हाचे क्षेत्र कमी करून ऊस लागवडीवर भर दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून खानापूर तालुक्‍याची ओळख. ही आता टेंभूच्या पाण्याने व शेतकऱ्यांना पाऊस देत असलेल्या साथीने पुसली जावू लागली. टेंभूच्या पाण्याने कृष्णाकाठाला असणा-या हिरवळीसारखा भाग या दुष्काळी तालुक्‍यात ऊस, द्राक्षांच्या रूपाने दिसू लागला आहे. 

तालुक्‍यातील टेंभूच्या कार्यक्षेत्रातील हिंगणगादे, चिखलहोळ, गार्डी, घानवड, माहुली, वलखड, साळशिंगे, लेंगरे, मादळमुठी या परिसरात तर वासुंबे, बामणी, पारे, चिंचणी, मंगरूळ, कार्वे, ढवळेश्वर या परिसरात तलाव व पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या वाढीमुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. परिसरात यशवंत, उदगिरी, विराज तसेच शेजारच्या कडेगांव तालुक्‍यात सोनहिरा, केन ऍग्रो साखर कारखाने असल्याने या कारखान्यांना ऊस पाठविणे सोयीचे झाले आहे. या ऊसातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी ऊस पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. 

द्राक्षाकडेही कल वाढला 
ऊसाबरोबर निर्यातक्षम द्राक्षे पिकवण्यावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी सातशे हेक्‍टर द्राक्षाचे क्षेत्र होते. त्यात आता दीडशे हेक्‍टरची वाढ झाली आहे. पैसे मिळवून देणा-या ऊस व द्राक्षांमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता मिळण्यास मदत झाली आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane field has increased by one thousand hectares