जेवणासाठी थांबले, अन् हा घडला अनर्थ...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सकाळी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून दोन ट्रकमधून ऊसतोड मजूर आले होते. अथणी ( कर्नाटक ) येथील रेणूका साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी ते निघाले होते. नवे कार्वे येथे सर्वजण थांबून जेवण करून पुढे जाणार होते.

विटा ( सांगली ) - ओढ्याच्या पाण्यात बुडून ऊसतोड मजूराच्या तीन वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. ही घटना नवे कार्वे ( ता.खानापूर ) येथे आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. ओंकार रवि जाधव ( रा. कोथूळभोवी, ता. अकोले, जि. नगर) असे त्याचे नांव आहे. याची फिर्याद पोलिस पाटील जोत्स्ना पाटील ( कार्वे ) यांनी विटा पोलिसात दिली. 

सकाळी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून दोन ट्रकमधून ऊसतोड मजूर आले होते. अथणी ( कर्नाटक ) येथील रेणूका साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी ते निघाले होते. नवे कार्वे येथे सर्वजण थांबून जेवण करून पुढे जाणार होते. दरम्यान, नजीकच शंभर मीटर अंतरावर असलेल्या ओढ्यावर ओंकारला सोबत घेऊन त्याची आई कपडे धुण्यासाठी गेली होती. ती कपडे धुत असताना जवळच ओंकार ओढ्यातील पाण्यात खेळत होता.

खेळत - खेळत तो खोल पाण्यात पडला. पाण्यात तो बुडू लागल्याने त्याच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. आरडाओरडा ऐकून नजीक असलेले त्यांच्या ऊसटोळीतील लोक ओढ्यापर्यंत आले. तोपर्यंत ओंकार पाण्यात बुडाला होता. ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ओंकारला लवकर पाण्यातून वर काढता आले नाही. काहीवेळाने त्यास पाण्यातून बाहेर काढले. तातडीने त्याला विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पण त्यांनी त्याला मृत घोषीत केले. याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane Harvesting Workers Child Death In New Karve