कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

ऊसतोड कामगारांना घेऊन जाण्यासाठी आलेला शेतकरी ट्रॅक्‍टरसमोर दुचाकीवरून चालला होता. ट्रॅक्‍टर पुलावर येईपर्यंत तो आरशातून मागे पाहत होता. पण, पुलानंतर ट्रॅक्‍टर दिसलाच नाही. म्हणून तो परत येऊन पाहतो तर ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलाचा कठडा तोडून खाली कोसळल्याचे दिसले. खालचे दृश्‍य विदारक होते. त्या शेतकऱ्यालाही घटनेने धक्का बसला होता.

खानापूर (बेळगाव) - कुणाची आई तर कुणाचा बाप ठार झाला. त्याचेच कुणीतरी जायबंदी झाले. नक्की कोण मयत झाले आणि कोण जखमी आहे हेच रात्री उशिरापर्यंत बोगूर (ता. खानापूर) ग्रामस्थांना समजत नव्हते. संपूर्ण गावच शोकमग्न झाले होते. गावभर फक्त आक्रोश सुरू होता. त्यामुळे, कुणी कुणाचे सांत्वन करायचे, हाच प्रश्न प्रत्येकासमोर होता. बोगूरमधील अपघातामुळे केवळ खानापूर तालुकाच नव्हे तर जिल्हाही हादरला. जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडाली.

ऊसतोड कामगारांना घेऊन जाण्यासाठी आलेला शेतकरी ट्रॅक्‍टरसमोर दुचाकीवरून चालला होता. ट्रॅक्‍टर पुलावर येईपर्यंत तो आरशातून मागे पाहत होता. पण, पुलानंतर ट्रॅक्‍टर दिसलाच नाही. म्हणून तो परत येऊन पाहतो तर ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलाचा कठडा तोडून खाली कोसळल्याचे दिसले. खालचे दृश्‍य विदारक होते. त्या शेतकऱ्यालाही घटनेने धक्का बसला होता. घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीतील लोकांनी गर्दी केली. बोगूरमधील प्रत्येकजण आक्रोश करीत होता. पण, त्यांना सावरण्याचे धाडस कुणालाही होत नव्हते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही त्यांना तोंड देणे अवघड बनले होते.

सहाही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

अपघाताची नोंद करून घेणे, मयत आणि जखमींची माहिती मिळवणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत बनली होती. घटनेच्या नोंदीसाठी स्वत: जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, उपाधीक्षक करुणाकर शेट्टी, तीन निरीक्षक, सहा उपनिरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी कार्यरत होते. माहिती मिळविण्यासाठी रुग्णालयातच कक्ष उघडला होता. त्या ठिकाणी बारा कर्मचारी घटनेची नोंद करुन घेत होते. जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या कुटुंबीयाचाही आक्रोश सुरू होता. एकंदर वातावरण हृदय पिळवटणारे होते. रात्री उशिरा सहाही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार झाले. मृतांमधील अशोक केदारी यांच्या पत्नी रूपा यांनी या अपघातात पाय गमावला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पती ठार झाल्याची माहिती त्यांना दिलेली नाही. 

दशकभरातील मोठी दुर्घटना

एकाच गावातील पाचहून अधिकजण ठार झाल्याची दशकभरात तालुक्‍यातील ही पहिलीच घटना ठरली. यापूर्वी सुमारे २५ वर्षांपूर्वी कक्केरीजवळील अपघातात चुंचवाडचे नऊजण ठार झाले होते. वीस वर्षांपूर्वी हत्तरगुंजी फाट्यावर वऱ्हाडाचा ट्रक उलटून हलशीतील आठ जणांचा मृत्यू झाला होता. १७ वर्षांपूर्वी हेब्बाळजवळ बस जळीतकांडात वेगवेगळ्या ठिकाणचे सहा प्रवासी ठार झाले होते.

मुख्यमंत्री निधीतून मदत देणार

घटनास्थळी भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी रुग्णालयात मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे जाहीर केले. जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी ग्वाहीही दिली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांना युद्धपातळीवर काम करुन पुन्हा एकही जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना केल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane labor tractor accident in khanapur