आगामी हंगामात उसाची हाेणार पळवापळवी !

विकास जाधव
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

अतिवृष्टी, महापुरामुळे हंगामावर परिणाम हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य निश्‍चिती, तसेच निवडणुकांमुळे उसाला पहिला हप्ता चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ऑगस्टच्या सुरवातीस झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध पिकांसह ऊस पिकाची मोठी हानी झाली आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांसह सातारा, जावळी, वाई तालुक्‍यांतील नदीकाठचा ऊस पाण्याखाली राहिल्याने ऊस कुजल्याने उत्पादनात घट होणार आहे. परिणामी आगामी ऊस गाळप हंगामात उसाचा तुटवडा भासणार असल्याने साखर उत्पादनात घट होणार आहे. 
अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेला पूर, तसेच शेतात पाणी साचल्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत अपरिमित हानी झाली आहे. तीनही जिल्ह्यांत ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने या पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. महापूर आलेल्या व नदीकाठचा ऊस दहा ते 12 दिवस पाण्याखाली राहिला होता. यामुळे अनेक ठिकाणचा ऊस कुजण्याबरोबरच वाढीवर परिणाम झाला आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत अनेक गावांत या महापुरामुळे हानी झाली आहे. या दोन तालुक्‍यांत पाच साखर कारखाने आहेत. यामध्ये सह्याद्री, कृष्णा वगळता इतर सर्व कारखान्यांचे कार्यक्षेत्र स्थानिक कऱ्हाड व पाटण तालुका असल्याने येथे ऊस कमी पडणार आहे. 
सर्व कारखान्यांची वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी सुरू असून, काही कारखान्यांचे मिल रोलर पूजन झाले आहे. हंगामाच्या तयारीत ऊसतोड मजुरांचे करार, कारखानांतर्गत कामे सुरू आहेत. साखरेचे किमान विक्री मूल्य निश्‍चिती, तसेच निवडणुकांमुळे उसाला पहिला हप्ता चांगला मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. हंगामाच्या तयारी सुरू असलेतरी ऊस मात्र कमी पडण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने या अगोदरही सातारा जिल्ह्यातील ऊस गाळपासाठी नेत होते. आता तर या दोन जिल्ह्यांतील ऊस खराब झाला असल्याने सातारा जिल्ह्यातून जास्त ऊस नेला जाण्याची शक्‍यता आहे. परिणामी गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची पळवापळवी होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

शेतकऱ्यांना राहणार चॉईस 

उसाचे झालेले नुकसान, तसेच लागवडीच्या क्षेत्रात झालेली घट यामुळे गाळपास ऊस कमी पडणार आहे. या हंगामात अनेक कारखानदारांना उसासाठी शेतकऱ्यांच्या दारात यावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस कोणत्या कारखान्यास द्यावा हा "चॉइस' राहणार आहे. आपल्या कारखान्याला ऊस मिळावा, यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील कारखान्यांच्या तुलनेत जास्त दर द्यावा लागणार आहे. 

निवडणुकांच्या अगोदर बिल मिळणार? 

जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखानदार विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. निवडणुकीच्या इतर प्रचारावर ऊस बिल मुद्दा हा कळीचा ठरणार आहे. कोणी किती बिल दिले, इतरच्या तुलनेत कमी जास्त, ऊसतोड, मजुरांचे पगार आदी मुद्‌द्‌यांवर प्रचार रंगणार आहे. मतदारांना खूष करण्यासाठी निवडणुकीअगोदर बिले जमा देण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane will be a takeaway in the coming season but...