
झरे (जि. सांगली) येथे ऊसतोड कामगारांच्या पोरांची शाळा झाडाखाली भरली. आरोग्य, स्वच्छता, यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
झरे (जि. सांगली) : येथे ऊसतोड कामगारांच्या पोरांची शाळा झाडाखाली भरली. आरोग्य, स्वच्छता, यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पूर्व प्राथमिक गटातील शिक्षण देण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ उपस्थित होत्या.
दैनिक "सकाळ' ने ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत असल्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन ऊसतोड मजुरांच्या पोरांना टी. एच. आर वाटण्यात आला. आजपासून प्रत्यक्ष उसाच्या फडात झाडाखाली शाळा भरवण्यात आली.
अंगणवाडी सेविका कल्पना नस्टे व मदतनीस मायाक्का गौरी यांनी पूर्व प्राथमिक व आरोग्य स्वच्छता प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले.
ऊस तोड कामगार म्हणाले,""आतापर्यंत अनेक ठिकाणी ऊसतोडीसाठी गेलो. आम्हाला कुठेही असे शिक्षण मिळाले नाही. आहार मिळाला नाही. अंगणवाडीताईंनी मुलाबाळांना आहार दिला. शिक्षण देत आहेत. आज उसाच्या फडावर येऊन त्यांनी शिक्षण देणे सुरू केल्यामुळे मुलांचे शिक्षण बुडणार नाही.''
ते म्हणाले,""ज्या पद्धतीने मुलांना शिक्षण दिले व शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्याच पद्धतीने सर्व ऊसतोड कामगारांना शिक्षण मिळावे ही सरकारला हात जोडून विनंती आहे.''
झाडाखाली पोरांची शाळा पाहण्यासाठी कामगारांची टोळी जमा झाली होती. यावेळी डॉ. प्रताप बेरगळ, तानाजी पाटील, भानू टिंगरे, विकास पाटील, प्रवीण पावणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आदर्श राज्याने घ्यावा
ऊसतोड कामगारांसाठी तालुक्यातील पहिली झाडाखालची शाळा भरली. याच पद्धतीने संपूर्ण तालुक्यामध्ये ऊसतोड कामगार पोरांना शिक्षण देणार आहोत. आमच्या तालुक्याचा आदर्श राज्याने घ्यावा.
- डॉ. भूमिका बेरगळ, सभापती
दैनिक "सकाळ' चे आभारी
दैनिक सकाळ व साम टीव्ही यांनी ऊसतोड मजुरांच्या पोरांची अडचण प्रकाशात आणली. प्रत्यक्षात ऊसतोड मजुरांच्या पोरांना शिक्षण देण्यास सुरुवात झाली. आम्ही साम टीव्ही. व दैनिक "सकाळ' चे आभारी आहोत.
- विकास पाटील, सामाजिक कार्यकर्ते
संपादन : युवराज यादव