
DUKE BIKE खरेदी करुन न दिल्याच्या रागातून आत्महत्या
बेळगाव : पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार (ता. १६) सकाळी आझादनगर येथे ही घटना उघडकीस आली असून अरीन अफजल मुल्ला (वय १८, मूळ राहणार होसपेटी गल्ली चिकोडी सध्या रा. आझादनगर) असे त्याचे नाव असून घटनेची नोंद माळमारुती पोलिस ठाण्यात झाली आहे.
मुल्ला कुटुंबीय मूळचे चिकोडी येथील राहणारे असून ते गेल्या काही वर्षापासून आजादनगर येथे वास्तव्यास आहेत. अरीन हा मला ड्यूक मोटर सायकल घेऊन द्या अशी मागणी गेल्या काही दिवसापासून पालकाकडे सातत्याने करत होता. मात्र, पालकांनी त्याला मोटरसायकल घेऊन दिली नाही. त्यामुळे रागाच्या भरात रविवार (ता.१५) रात्री त्याने राहत्या घरी बेडरुमच्या फॅनाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक व्हनाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला