सुमैय्या, रियाज बनले एकमेकांचा आवाज; कर्णबधिर जोडप्याचा मिरजेत विवाह

 सुमैय्या, रियाज बनले एकमेकांचा आवाज; कर्णबधिर जोडप्याचा मिरजेत विवाह
Updated on

मिरज - शिकली-सवरलेली सुमैय्या सुस्वभावी आणि कुटुंबवत्सल, पण ईश्वराने वाचा न देता तिच्या जगण्यापुढे आव्हान वाढून ठेवलेले. कर्णबधिर सुमैय्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्या लग्नाची समस्या उभी राहिली. सुदैवाने जयसिंगपुरातील रियाज तिच्या आयुष्यात आला. तोदेखील कर्णबधिर. दोघांनी परस्परांचा आवाज बनण्याचे ठरवले. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या साक्षीने काल (ता. 25) मिरजेत त्यांचा निकाह पार पडला.

विशेष म्हणजे, या लग्नसोहळ्यातच कर्णबधिर सबलीकरण प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी जातीने उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. 

जिल्हा परिषदेचे कर्मचारी असणाऱ्या फिरोझ शेख यांची नईम आणि सुमैय्या ही दोन्ही मुले जन्मतःच कर्णबधिर. त्यांच्या पालणपोषणाचा मोठा प्रश्‍न शेख कुटुंबीयांपुढे होता. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. शिक्षणच दोघांच्या जीवनाचा आधार बनेल हे लक्षात घेऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या वाटेवर नेले. चांगले शिक्षण हेच सर्वस्व मानून खर्चही केला. कर्णबधिरांच्या शाळेऐवजी सर्वसाधारण मुलांसोबत शिक्षण दिले. मुलांनी त्याचे चीज केले. नईमने चांगल्या गुणांनी पदवी मिळवत विक्रीकर विभागात नोकरी मिळवली. सुमैय्याही फॅशन डिझाईनिंग व अडव्हान्स टेलरिंगचे काम करू लागली. 

तिच्या लग्नासाठी रियाजच्या रुपाने स्थळ आले. तोदेखील जन्मतः कर्णबधिर. जयसिंगपुरात कारखान्यात काम करतो. सुमैय्याच्या वडिलांनी त्याची रितसर चौकशी केली. सुमैय्यासाठी तो अनुरूप असल्याची खात्री पटताच काल दोघांचाही निकाह लावून दिला. विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी नईमचे पन्नास दिव्यांग मित्र हजर होते. 

सांगलीतील आयजीसी फोरमने चार वर्षांपासून या कर्णबधिर भावंडांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी घेतली होती. दोघा भावंडांसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येताच अन्य दिव्यांगांसाठीही कर्णबधिर प्रशिक्षण सबलीकरण केंद्र सुरू केले, त्याचे उद्‌घाटन नवदाम्पत्याच्या हस्ते केले. याप्रसंगी मंत्री खाडे, पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, फोरमचे डॉ. के. जी. पठाण, जहीर मुजावर, नगरसेवक नर्गीस सय्यद, मैनुद्दीन बागवान, किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, फिरोज मुलाणी आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com