रविवारने वाचवले 225 विद्यार्थ्यांचे प्राण... भाळवणीत कोसळली शाळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

गेल्या दहा वर्षांपासून या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल केले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच पदाधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला. या इमारतीच्या इतर भागातही मोठमोठे तडे गेले आहेत. दहशतीच्या सावटाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत बसावे लागते.

भाळवणी ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पश्‍चिम दिशेकडील इमारतीची भिंत रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कोसळली. सुदैवाने सुट्टीचा दिवस असल्यामुळे विद्यार्थी शाळेत नसल्याने मोठा अनर्थ टळला. 
गेल्या दहा वर्षांपासून या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल केले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच पदाधिकाऱ्यांनीही कानाडोळा केला. या इमारतीच्या इतर भागातही मोठमोठे तडे गेले आहेत. दहशतीच्या सावटाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत बसावे लागते. 

80 वर्षांची होती इमारत 
आजच्या या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे 80 वर्षांची ही इमारत आहे. या शाळेच्या सर्व आठही खोल्या नव्याने बांधण्याची गरज आहे. पडलेल्या भिंतीच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह असल्याने मोठी वर्दळ या भागात असते. गेल्याच आठवड्यात आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भाळवणी येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. 

यावेळी पवार यांनी या इमारतीची पाहणीही केली होती. यासंदर्भात या इमारतीचे ऑडीट पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून केले होते. ही इमारत धोकादायक असल्याचे निर्लेखनही करण्यात आले. परंतु प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. 

पत्र दिले होते पण... 
या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक श्रीपती आबुज यांच्याशी संपर्क साधला असता पहीली ते चौथी या वर्गात एकूण 224 विद्यार्थी शिक्षण घेतात. 9 शिक्षक येथे कार्यरत आहेत. ही संपूर्ण इमारत पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. जिल्हा परिषदेने ही इमारत पाडण्याचे परवानगी पत्र दिले आहे. परंतु बांधकाम निधीबाबत कोणतेही निर्देश नसल्याने इमारत कशी बांधावी हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याचे मुख्याध्यापक आबुज यांनी सांगितले. 

...तर सोमवारपासून शाळा बंद ठेवू 
या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंद चेमटे यांनी सांगितले की, शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी धोकादायक इमारतीत वर्ग न भरवता दुसरीकडे भरवा, असे सांगितले आहे. इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नाही. जेव्हा निधी उपलब्ध होईल, तेव्हा तो दिला जाईल असे सांगण्यात आले. 
या इमारतीच्या बांधकामाचा निर्णय तातडीने घेतला नाही तर सोमवारपासून मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday rescues the lives of 225 students