इस्लामपुरात 'माणुसकीच्या नात्या'कडून होणार 'प्राणवायू'चा पुरवठा

धर्मवीर पाटील
Tuesday, 8 September 2020

कोरोनाचा घट्ट होत चाललेला विळखा आणि ऑक्सिजन कमी पडण्याची समस्या विचारात घेऊन इस्लामपूरच्या 'माणुसकीच्या नात्या'ने पुढाकार घेत समाजाला आवाहन केले आणि पहातापाहता मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत.

इस्लामपूर : कोरोनाचा घट्ट होत चाललेला विळखा आणि ऑक्सिजन कमी पडण्याची समस्या विचारात घेऊन इस्लामपूरच्या 'माणुसकीच्या नात्या'ने पुढाकार घेत समाजाला आवाहन केले आणि पहातापाहता मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये आणि ज्यांना गरज आहे, अशांना उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी त्यासाठी आवाहन केले होते. सुरवातीला अन्नदान, ज्ञानदान, त्यानंतर वाचन चळवळ आणि आता ऑक्सिजन यंत्राच्या उपलब्धतेसाठी या संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद ठरला आहे. मानवी संवेदनशीलता जपणारा हा समूह उपेक्षित घटकाच्या मदतीसाठी तत्परतेने पुढे येताना दिसत आहे.

कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनअभावी अनेक लोक मृत्युमुखी पडत असल्याचे आजूबाजूचे चित्र वेदनादायी आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे लोक कराड, कोल्हापूर, सांगलीचे दवाखाने गाठत आहेत; परंतु गोरगरीब, मध्यमवर्गीय लोकांचे हाल सुरू आहेत. व्हेंटिलेटर, बेड मिळणे मुश्कील झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णात पिंगळे यांनी कराडचे उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या पुढाकारातून कराड शहरात सुरू असलेल्या कराडची माणुसकी ह्या उपक्रमाची नोंद घेतली. कराडच्या ग्रुपने ऑक्सिजन ग्रुप तयार करून व्हेंटिलेटर उपलब्ध न होणाऱ्या गोरगरीब लोकांना आधार दिला आहे. त्याच धर्तीवर इस्लामपुरात गरजू लोक ऑक्सिजन मशीन वापरतील आणि ऑक्सिजन पातळी नियमित झाल्यावर ते मशीन परत आणून देतील, ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून श्री. पिंगळे यांनी इस्लामपूर शहरासाठी 'माणुसकीच्या नात्या'च्या ग्रुपला आवाहन केले. ऑक्सिजन मशीन किंवा मशीन खरेदीसाठी आर्थिक स्वरूपात मदतीचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

ऑक्सिजन मशीन्स आणि त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या दात्यांची नावे अशी : प्रा. नसरीन शेख, कृष्णात पिंगळे, सर्जेराव यादव, विनायक भोसले, विकास राजमाने, श्रीकृष्ण पाटील व पोलीस हवालदार संपत वारके, प्राचार्य महेश जोशी, सुनील वैद्य, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. संजय थोरात, सतीश चरापले, सुनील पाटील, वैभव पाटील, प्रा. डॉ. अशोक शिंदे, संभाजी कुशीरे, प्रा. प्रमोद गंगणमाले, अस्लम मोहम्मद हुसेन शेख, ॲड. प्रीतम सांभारे साहेब, डाॅ अतुल मोरे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, ॲड. विश्वासराव पाटील, बाबासाहेब वंजारी, उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, सुनील पाटील, वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, तानाजी पाटील, आदित्य घाडगे, यशवंत चहावाला, स्व सक्षम फौंडेशन, सतीश सूर्यवंशी, रणजीत मंत्री, अरुण बिळासकर, विकास रायगांधी, प्रज्ञा घोरपडे, अमोल पाटील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply of 'oxygen' from 'MANUSKICHE NATE' will be done in Islampur ...!