कोरोनामुक्तीसाठी आधार देणे, ही आता सामाजिक चळवळ व्हावी

अजित झळके 
Thursday, 24 September 2020

कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होणे, त्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी आधार देणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया राहिलेली नाही. ती आता सामाजिक चळवळ बनली पाहिजे.

सांगली : कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होणे, त्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी आधार देणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया राहिलेली नाही. ती आता सामाजिक चळवळ बनली पाहिजे. त्यात समाज घटकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी आज येथे केले. 

येथील राजमती भवनमध्ये मिशन कोविड कनेक्‍ट उपक्रमाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, संघटनेचे राष्ट्रीय सदस्य सुरेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. 

मुथा म्हणाले, ""कोरोना उपचारासाठी आता शासनाला मर्यादा पडत आहेत. लोकांनी शंभर टक्के साथ दिली तरच या महासंकटाला तोंड देणे शक्‍य आहे. समाज घटकांनी एकत्र येऊन कोरोना रुग्णालय, प्राथमिक केंद्र, विलगीकरण कक्ष स्थापन केली. ती उपयुक्त ठरली. आता पुढचा टप्पा आहे. रुग्णांना वेळीच शोधणे, वेळेवर उपचार सुरु होणे, त्यांना मानसिक आधार देणे हे अधिक महत्वाचे आहे. त्यासाठी ही मिशन कोविड कनेक्‍ट मोहिम काम करेल. रुग्णांना लागेल ती सेवा देऊ. अधिकाधिक डॉक्‍टरांना प्रशिक्षण देऊ. मोबाईल डिस्पेन्सरी चालवू.'' 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ""कोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार अत्यावश्‍यक आहे.'' श्री. डुडी म्हणाले, "" देशभरात जैन बांधवांचे या लढ्यातील योगदान लक्षवेधी आहे.'' 

सुरेश पाटील यांनी भगवान महावीर कोविड रुग्णालयाचा आढावा घेतला. ते म्हणाले,"" 50 लाखांच्या दे देणगीतून रुग्णालयास प्रारंभ झाला. आत्तापर्यंत 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले.'' 

यावेळी समाजाच्या स्तरावर कोविड सेंटर सुरु केल्याबद्दल आसिफ बावा, विश्‍वनाथ मिरजकर, पिरअली पुणेकर, संजय बेले, रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील यांचा प्रातिनिधिक सत्कार झाला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supporting coronation should be a social movement