सांगलीतील दाम्पत्याने बांधले नात्याचे नवे बंध! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

हिंदू मुलीचे केले कन्यादान; बहीण-भावाचा लहाणपणापासून केला सांभाळ 

ऐतवडे खुर्द (सांगली) : एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत अंतर्मनाने जोडलेल्या नात्याला जात धर्म नसतो याचा प्रत्यय चिकुर्डे (ता. वाळवा) येथील नागरिकांना आला आहे. गावातील एका मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू मुलीचे कन्यादान करण्यात आले. विवाह अतिशय थाटामाटात झाला. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन जपलेल्या या नात्यातील जिव्हाळा यावेळी दिसून आला. 
चिकुर्डेतील सुप्रिया पोपट बंडगर या मुलीचा विवाह पेठ येथील रवींद्र करे यांच्याशी झाला. हा विवाह चिकुर्डे येथे पार पडला. विशेष म्हणजे या विवाहासाठी आजूबाजूचे काहीजण सोडल्यास कोणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. तरीही सुप्रियाच्या डोक्‍यावर अक्षता टाकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्येचा आकडा मात्र मोठा होता. निमंत्रण नसतानाही अनेकांनी स्वयंप्रेरणेने उपस्थिती दर्शवली होती. 

सुप्रिया ही धनगर कुटुंबातील मुलगी. ती सहा वर्षांची असताना वडिलांचा मृत्यू झाला. आई तेव्हापासूनच मनोरुग्ण आहे. ती गावातून, तसेच इतरही गावांतून इकडून तिकडे फिरत राहायची. सुप्रियाचा भाऊ प्रतीक बंडगर हा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. पालकांचे छत्र हरवल्याने या लेकरांच्या वरती असणारे मायेची व निवाऱ्याची छाया नष्ट झाली. काही दिवस लोकांकडून त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु त्यानंतर मात्र या दोन लहान मुलांचे हाल सुरू झाले. सुप्रिया अवघी सहा वर्षांची व प्रतीक अवघा दोन वर्षांचा असल्याने कशाचाच कशाला पत्ता नव्हता. 

त्यांची ही अवस्था पाहून गावातीलच मुस्लिम दांपत्य पैगंबर व हसीना गवंडी यांना या दोन बछड्यांची दया आली. या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच होती. मात्र आर्थिक श्रीमंतीपेक्षा, मनाची श्रीमंती फार मोठी होती. त्यांनी सुप्रिया व प्रतीकला आपलेसे केले. या मुस्लिम कुटुंबांना अमीर, सद्दाम, अस्मा ही तीन अपत्ये असतानाही, बेवारस असलेल्या या दोन मुलांना रक्ताचे नाते मानूनच त्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले. पैगंबर चाचा व चाचीकडून पोटच्या मुलांप्रमाणेच खाण्यापिण्यासह प्रत्येक बाबतीत वागणूक दिली जात होती. आपल्याला तीन मुले नसून, पाच मुलांचे वरदान परमेश्वराने दिले असल्याची मानसिकता या दोघांनी ठेवली आणि सुप्रिया व प्रतीकचा सांभाळ केला. 

हेही वाचा- धोम, पतंगराव गेले...सागरेश्‍वर पोरके झाले; विकासकामे रेंगाळली -

सुप्रियाने येथील विद्यालयात शिक्षण घेऊन बारावीत तिसरा क्रमांक मिळवला. प्रतीकही माध्यमिक शिक्षण घेत आहे. प्रतिकूल स्थिती असतानाही सुप्रियाने बारावीत यश मिळवल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. कालांतराने तिला पेठ येथील एका धनगर कुटुंबातून विवाहासाठी मागणी करण्यात आली. मुलगा व नोकरी या सर्व गोष्टींची चौकशी पैगंबर दंपत्याने केली. अखेर येथील रवींद्र करे या युवकाशी सुप्रियाचा विवाह झाला. रवींद्र मुंबई येथील महाविद्यालयात नोकरी करतो. आता त्याचे आयुष्य सुप्रियासोबत गुंफले गेले आहे. गवंडी दाम्पत्याने मोठ्या उत्साहाने सुप्रियाचे कन्यादान केले, विवाहही थाटात लावून दिला. ग्रामस्थांनीही आस्थेनेही उपस्थिती लावली व नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. हिंदू मुलीचे मुस्लिम दांम्पत्याकडून करण्यात आलेले कन्यादान जातीधर्माच्या पलीकडच्या नात्याचे बंध बांधून गेले! 

 

सुप्रिया आणि प्रतीक या दोघांचे आम्हा पत्नी-पत्नीला कधीच ओझे वाटले नाही. अनाथ व बेवारस असलेली मुले आम्ही दोघांनी कागदोपत्री नसले तरी, मनाने आमच्या कुटुंबात सामावून घेतली. आम्हाला तीन नव्हे, तर पाच मुले आहेत, असे समजूनच त्यांचा सांभाळ केला. आज सुप्रियाच्या डोक्‍यावरती अक्षता टाकताना व तिचे कन्यादान करताना मला व माझ्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले. मनोमन आम्ही परमेश्वराचे आभार मानले. एक पुण्यकर्म परमेश्वराने आमच्या हातून पार पाडून घेतले आहे. सुप्रियाचा संसार सुखाचा निश्‍चित ठरेल व प्रतीकलाही चांगले शिक्षण देण्यासाठी परमेश्वर आम्हाला ताकद देईल. 
- पैगंबर गवंडी, चिकुर्डे 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya bandgar married story sangli