आश्‍चर्य...सांगली महापालिकेने यासाठी केले अतिक्रमण

sangli corporation.jpg
sangli corporation.jpg
Updated on

सांगली-महापालिकेच्या जागेत अतिक्रमण करणे, महापालिकेच्या मोकळ्या जागा ढापणे यात नवीन काही नाही. त्याचा शोध घेण्याची तसदीही महापालिका प्रशासन फारशी घेत नाही. पण, या भोंगळ कारभाराचा कळस म्हणजे खासगी प्लॉटमध्येच अतिक्रमण करुन गटार बांधण्याची कामगिरी महापालिकेने केली आहे. 


वसंतदादा कुस्ती केंद्राजवळच्या शंभर फुटी रस्त्यावरील स्फूर्ती हौसिंग सोसायटीमध्ये महापालिकेने सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारी बांधल्या आहेत. मात्र यात एक गटार खासगी प्लॉटमध्ये बांधली जातेय हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षातही आले नाही. प्लॉट मालकालाच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी महापालिकेकडे सदरची गटार काढून टाकण्यासाठी धडपड सुरु केली आहे. याबाबत आयुक्‍तांना निवेदन देण्यात आले आहे. पण, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. 


यशवंतनगरमध्ये स्फूर्ती हौसिंग सोसायटी आहे. तेथे शाबिरा बाबासाहेब बारुदवाले यांचा सिटी सर्व्हे नं. 5130 हा प्लॉट या सोसायटीमध्ये आहे. गेली वीस वर्षे हा प्लॉट त्यांच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या वतीने या सोसायटीमध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार बांधण्यात आली आहे. गटार बांधण्याच्या हालचाली सुरु झाल्यावर बारुदवाले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गटार आपल्या प्लॉटमध्ये येत असून प्लॉटची मोजणी झाल्यानंतर ती बांधावी अशी विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत गटार बांधण्यात आली. 


यानंतर सदरच्या प्लॉटची मोजणी झाली आणि त्यामध्ये महापालिकेने बांधलेली गटार अतिक्रमित ठरली आहे. पण, आता ही गटार काढण्याची जबाबदारी महापालिकेने अजून स्वीकारलेली नाही. त्याशिवाय ही गटार काही घरांपुरतीच मर्यादित असून ती अर्धवटच आहे. त्यामुळे गटारीतून बाजूच्या प्लॉटमधून येणारे सांडपाणी बारुदवाले यांच्या प्लॉटमध्ये पसरत आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. गटारीचे अतिक्रमण काढून घेतले नाही तर गटार बंद करुन सांडपाणी सार्वजनिक रोडवर सोडण्याचा इशाराही बारुदवाले यांनी महापालिकेस दिला आहे. 


शाबिरा बारुदवाले यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत निवेदन देऊनही पंधरवडा झाला तरीही त्यावर कार्यवाही झालेली नाही. आता प्रभाग समिती दोनच्या कार्यालयात त्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. महापालिकेच्या चुकीची सामान्यांना अशी झळ बसत आहे. मात्र त्याबद्दल अधिकाऱ्यांना काहीच देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. 


माझ्या प्लॉटमध्ये गटार बांधण्यापुर्वी मी महापालिका अधिकाऱ्यांना मोजणी केल्यानंतर काम करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. आता ही गटार माझ्या प्लॉटमधून गेल्याने त्याचा त्रास होत आहे. शिवाय या गटारीचा फायदा तीन-चार घरांनाच होत आहे. ही गटार काढून घेण्याविषयी महापालिकेला कळवूनही त्यावर अजून कारवाई झालेली नाही. 
शाबिरा बारुदवाले, प्लॉटधारक  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com