जिल्ह्यात साडे पाच लाख नागरिकांचा सर्व्हे : जितेंद्र डुडी...कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना 

अजित झळके
Sunday, 30 August 2020

सांगली-  कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात 50 वर्षावरील नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असून आत्तापर्यंत 5 लाख 29 हजार 722 लोकांचा सर्व्हे करून 3 हजार 240 स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी 1 हजार 278 नागरिक पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. 

सांगली-  कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात 50 वर्षावरील नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असून आत्तापर्यंत 5 लाख 29 हजार 722 लोकांचा सर्व्हे करून 3 हजार 240 स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी 1 हजार 278 नागरिक पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. 

डुडी म्हणाले, ""जिल्ह्यात 28 ऑगस्ट अखेर कोरोना विषाणू संसर्गाचे 10 हजार 422 रूग्ण आढळून आले असून यापैकी 6 हजार 293 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 428 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 63 हजार 109 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. गेल्या 7 दिवसात 8 हजार 101 तपासण्या झाल्या. पॉझिटीव्हीटी रेट 16.25 असून मृत्यू रेट 4.10, रिकव्हरी रेट 60.38 तर डब्लींग रेट 20.1 असा आहे. यामध्ये 20 ते 50 वयोगटातील नागरिक जास्त प्रभावीत असून 50 ते 80 वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीत कंटेनमेंट झोन 1 हजार 268 असून उच्च धोका कॉन्टॅक्‍ट (प्रति केस प्रमाण) 17.90, कमी धोका कॉन्टॅक्‍ट (प्रति केस प्रमाण) 18.63 आहे. 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जावून तापमान व ऑक्‍सिजन तपासणी करण्यात येत आहे.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या प्रत्येक रूग्णांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येते. मेडिकल किटमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन बी-12 गोळ्या तसेच ग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क व माहिती पुस्तिका देण्यात येत आहेत. तसेच दररोज कॉल सेंटरमधून रूग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात येत आहे. रूग्णांचा लॅब रिपोर्ट स्वयंचलित एसएमएस सुविधेद्वारे देण्यात येत आहे. कॉल सेंटर कार्यान्वीत केले असून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोविड रूग्णांच्या आरोग्य तक्रारीबाबत तसेच केअर सेंटर, हेल्थ सेंटर व अन्य तक्रारी बाबत ऑगस्ट 2020 मध्ये 25 हजार 897 कॉल करण्यात आलेले आहेत. बेडस्‌चे व्यवस्थापन आणि रूग्णांच्या प्रवेशासाठी रूग्णालय शोधण्यासाठी रूग्णांना मदत करणे यासाठी बेड उपलब्धेबाबत कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे.'' 

ते म्हणाले,""चाचणी सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी 40 हजार अँटीजेन टेस्ट किट जिल्हा वार्षिक योजना निधीतून खरेदी करण्यात येत असून अधिकची 50 हजार किटचीही मागणी करण्यात आली आहे. 10 हजार किट जिल्हा परिषदेच्या एसईएस फंडामधून खरेदी करण्यात येत आहेत. पल्स ऑक्‍सिमिटर 1 हजार 953 असून थर्मल स्कॅनर 2 हजार 301 आहेत. तसेच 6 फिजीशियन, 300 नर्सेस, 65 आयुष वैद्यकीय अधिकारी, 48 डाटा एन्ट्री ऑपरेटर व 17 लॅब्रॉट्ररी टेक्‍नीशियनची भरती करण्यात आली आहे. प्रसार माध्यमांसह प्रत्येक तालुक्‍यात दोन वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. मोबाईल व्हॅन आणि एलईडी व्हॅनही प्राप्त झाल्या आहेत. 100 स्टॅंडीज प्रदर्शित करण्यासाठी तयार आहेत.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of five and a half lakh citizens in the district : Jitendra Dudi, Measures to prevent the spread of corona