कारवाईच्या भीतीने संशयिताने प्याले सॅनिटायझर

बादल सर्जे
Monday, 28 September 2020

कारवाई होण्याच्या भीतीने व पोलिसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने चोरीच्या चौकशीसाठी आणलेल्या संशयिताने पोलिस ठाण्यातच सॅनिटायझर प्राशन केले.

जत (जि. सांगली)  ः कारवाई होण्याच्या भीतीने व पोलिसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने चोरीच्या चौकशीसाठी आणलेल्या संशयिताने पोलिस ठाण्यातच सॅनिटायझर प्राशन केले. सुभाष राजू वाघमोडे (वय 25, रा. शंकर कॉलनी, जत) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्या संशयिताला तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी माहिती दिली, की बलभीम पाटील यांच्या मालकीच्या खडी क्रशरवर काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. यात पोलिस केरबा चव्हाण यांनी या घटनेचा तपास करून भगवान इरकर (कंठी) व बाळ भोसले (विठ्ठल नगर, जत) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सुभाष वाघमोडे याच्या भंगार दुकानात साहित्य दिल्याचे सांगितले. 

दरम्यान, जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीपूर्वीच आज दुपारी तीनच्या सुमारास त्याने खिशातून आणलेले सॅनिटायझर प्याले. पोलिसांनी तातडीने त्याला जत ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याची तब्येत ठीक असल्याचे सांगितले. 

उपचारानंतर कारवाई 
पोलिसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने सुभाष वाघमोडेने हे कृत्य केले. उपचारानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भंगार व्यावसायिक व सोने-चांदी व्यापाऱ्यांनी चोरीचा माल खरेदी करताना चौकशी करून खरेदी करावा, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांनी दिला आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suspect drank sanitizer for fear of action