स्वाभिमानी आणि पोलिसात जोरदार झटापट...एकरकमी एफआरपीसाठी गव्हाणीत उड्या मारण्यापूर्वी सांगलीत पोलिसांनी रोखले 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

सांगली- एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज वसंतदादा कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीवर धडक मारली. गव्हाणीत उड्या मारण्यासाठी बॅरिकेटस्‌ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

सांगली- एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज वसंतदादा कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीवर धडक मारली. गव्हाणीत उड्या मारण्यासाठी बॅरिकेटस्‌ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

दरम्यान कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे, शरद मोरे आदींनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हाध्यक्ष महेश खराडे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. सध्या 2500 रूपयाप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरीत 392 रूपयाचा दुसरा हप्ता दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. तसेच एकरकमी एफआरपी दिली जाईल असे आश्‍वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

जिल्ह्यात साखर हंगाम सुरु होण्यापूर्वी कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत बैठक झाली होती. त्यावेळी एक रकमी एफआरपी देण्याचे कारखान्यांनी जाहीर केले होते. परंतू जिल्ह्यात सोनहिरा, उदगिरी शुगर, निनाईदेवी कारखाना वगळता इतर साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली नव्हती. सर्वांनी 2500 रूपयेप्रमाणे पहिला हप्ता काढला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. एकरकमीसाठी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. तसेच आज दत्त इंडियाच्या गव्हाणीत उड्या मारण्याचे आंदोलन जाहीर केले होते. 

गव्हाणीत उड्या टाकण्याचा इशारा दिल्याने कारखाना स्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस्‌ टाकून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. 
कारखान्याचे उपाध्यक्ष मृत्युजंय शिंदे, शरद मोरे यांनी आंदोलनस्थळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी उर्वरित बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात वर्ग केले जातील. तसेच एकरकमी एफआरपी दिली जाईल असे आश्‍वासन दिले. 

आंदोलनाची अशीही चर्चा- 
दत्त इंडिया कंपनी चालवत असलेल्या वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आहेत. विशाल पाटील यांनी लोकसभेची निवडणूक स्वाभिमानीच्या चिन्हावर लढवली होती. आज त्यांच्याच कारखान्याच्या आवारात एकरकमीसाठी स्वाभिमानीने धडक मारल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani and a fierce fight between the police . Sangli police stopped before jumping for a single FRP

टॉपिकस
Topic Tags: