‘स्वाइन फ्लू’चे जिल्ह्यात डोके वर

प्रवीण जाधव
Tuesday, 16 July 2019

...असा रोखा प्रसार

 • शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रुमाल लावणे 
 • हात सातत्याने साबणाने धुणे
 • डोळे, नाक, तोंड यांना वारंवार हात लावू नये
 • घर व कार्यालयातील टेबल, टीपॉय, संगणक की बोर्ड वारंवार स्वच्छ करणे
 • सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे
 • हस्तांदोलनाऐवजी पारंपरिक पद्धतीने नमस्कार करणे
 • गर्दीत जाणे टाळणे
 • सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांनी घराबाहेर न पडणे
 • भरपूर पाणी पिणे 
 • आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्ये यांचा नियमित समावेश असावा
 • सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा

आरोग्य यंत्रणा सतर्क; आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनीही काळजी घेणे आवश्‍यक
सातारा - पावसाच्या संततधारेमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयामध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या उपचारांची सुविधा करण्यात आली आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

सर्वसाधारण फ्लूप्रमाणेच लक्षणे
स्वाइन फ्लूला शास्त्रीय भाषेत इन्फ्लूएंझा (एन १ एन १) असे म्हटले जाते. हा एक विषाणूजन्य आजार आहे. १८ मार्च २००९ रोजी मेक्‍सिको देशात सर्वप्रथम या साथीची सुरवात झाली. मेक्‍सिकोतील ला ग्लोरिया या छोट्याशा खेड्यातून सुरू झालेली ही साथ सध्या जगातील १७० हून जास्त देशांत पसरली आहे. आजार झालेल्या व्यक्तीपासून दुसऱ्याकडे या आजाराचा प्रसार होऊ शकतो. बाधा झालेल्या व्यक्तीच्या नाकातून व घशातील स्त्रावातून हे विषाणू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळच्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. नेहमीच्या फ्लूसारखीच सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी अशी याची लक्षणे आहेत. फार थोड्या रुग्णांना जुलाब व उलट्यांचाही त्रास होतो. 

उपचार कुठे? 
स्वाइन फ्लूच्या उपचारामध्ये दाखल करून घेण्याची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये चार बेडचा स्वतंत्र आयसोलेटेड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर व परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी टॅमी फ्लू गोळ्यांची उपलब्धता जिल्ह्यामध्ये ८९ ठिकाणी करून देण्यात आली आहे. त्यामध्ये ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. तसेच रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नुमने घेण्याची सुविधा जिल्हा रुग्णालयात तसेच काही खासगी लॅबमध्ये करण्यात आली आहे. 

हायरिस्क रुग्णांसाठी लसीकरण
गरोदर माता, शून्य ते सहा वयोगटातील मुले, मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांसाठी दीड महिन्यांपासून स्वाइन फ्लूची लस देण्यास सुरवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. आणखी लस उपलब्ध झाल्यास दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यास सुरवात करणार असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयेही हवीत दक्ष
  शाळेमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी
  सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास संबंधित पालकांशी संपर्क साधावा
  स्वच्छता, हात धुणे याबाबत विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करावे
  जेवणापूर्वी व इतर वेळी हात धुण्यासाठी शाळेमध्ये साबण, पाणी व शक्‍य असल्यास वॉश बेसिनची सुविधा करावी
  शालेय परिसर, शौचालये, मुताऱ्या आदींची नियमित स्वच्छता करावी
  विद्यार्थ्यांची नखे नियमित कापावीत
  विद्यार्थ्यांमध्ये स्वाइन फ्लू आढळल्यास शाळेला काही दिवस सुटी द्यावी
  पिण्याच्या पाण्याची टाकी, शौचालय, वॉश बेसीन याठिकाणचे नळ, टॅप यांची वारंवार स्वच्छता करावी
  विद्यार्थ्यांना बेंच पुसून स्वच्छ करण्यास सांगावेत
  स्वच्छ सुती कापडाचा रुमाल वापरण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे

घाबरू नये - डॉ. अमोद गडीकर 
वेळेत उपचार सुरू केल्यास स्वाइन फ्लू हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे लक्षण दिल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्‍टरचे उपचार घ्यावेत. २४ ते ४८ तासांमध्ये सुधारणा न झाल्यास तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधून टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले आहे.

रुग्णांनी अशी घ्यावी काळजी 
  लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी
  प्राथमिक टप्प्यात आजार बरा करणे सोपे असते. त्यामुळे 
घरच्या घरी उपचार करण्याचा प्रयत्न करू नये
  संशयिताने एन-९५ प्रकारचा मास्क सातत्याने वापरावा, नऊ तासांनी तो बदलावा
  वापरलेला मास्क इतरत्र फेकू नये 
  सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, सार्वजनिक वाहनातून प्रवास करू नये,
टॉमी फ्लू गोळीचा पूर्ण डोस घ्यावा
  सार्वजनिक दूरध्वनीचा वापर करू नये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swine Flu Sickness Healthcare