ताकारी स्थानकात रेल्वे गाड्यांना केव्हा मिळणार थांबा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Takari Railway Station

सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या ताकारी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने ग्रामस्थ प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Railway : ताकारी स्थानकात रेल्वे गाड्यांना केव्हा मिळणार थांबा?

नवेखेड - सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या ताकारी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने ग्रामस्थ प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून या स्थानकाचा कायापालट केला आहे, तो कशासाठी, असा परिसरातील ग्रामस्थांचा प्रश्न आहे.

सध्या या स्थानकावर महालक्ष्मी एक्स्प्रेस व पॅसेंजर या दोनच गाड्या थांबतात. जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर या तालुक्यांतील प्रवाशांना मध्यवर्ती असणारे हे स्थानक आहे. रेल्वेचे जवळपास २४ डबे थांबतील इतके लांब व उंच असे तीन प्लॅटफॉर्म्स आहेत. पादचाऱ्यांना रूळ ओलांडायला उड्डाण पूल बांधला आहे, अशा सर्व सुविधा येथे आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे काही गाड्यांचा थांबा बंद केला. कोरोना संपला सर्व सुरळीत झाले आहे. मात्र, या स्थानकावर थांबा नाही.

या ठिकाणी सुरू असलेली गोंदिया एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, चालुक्य एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेल्ली, शरावती एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, मैसूर एक्स्प्रेस, बंगळूर-जोधपूर, बंगळूर-गांधीग्राम एक्स्प्रेस गाड्यांना पूर्वी असणारा ताकारीचा थांबा रद्द करण्यात आला आहे. व्यापारी, नोकरदारांना देशाच्या कानाकोपऱ्यात जा-ये करण्यासाठी ताकारी हे मध्यवर्ती स्थानक आहे. इतका प्रचंड पैसा खर्च करून ताकारी स्टेशनचे रुपडे पालटले. पण जर गाड्याच थांबत नसतील तर त्याचा काय उपयोग, असा प्रवाशांचा प्रश्न आहे.

येथील प्रवाशांनी वेळोवेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, रेल्वे प्रशासन यांना निवेदन दिले आहेत. पण त्याला यश आलेले नाही. ताकारी रेल्वे स्थानकाला पूर्वी चांगला महसूल मिळत होता. या गाड्या थांबू लागल्या की प्रवाशांचा आणखी ओघ वाढू शकतो. ताकारी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे या स्टेशनला थांबे मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

अर्ज विनंत्या करून झाले आहे. रेल्वे प्रशासन याची दखल घेणार नसेल तर भविष्यात रेल रोको आंदोलन केले जाईल.

- शिवाजी पाटील, ग्रामस्थ ताकारी

बंद असणाऱ्या गाड्या सुरू करणे, बंद थांबे सुरू करणे, यासाठी सर्वच खासदारांनी मागणी केली आहे. त्याची कार्यवाही लवकरात लवकर होईल, मी यासाठी आग्रही आहे

- धैर्यशील माने, खासदार, हातकंणगले लोकसभा मतदार संघ.

टॅग्स :Sanglirailway