आई-वडिलांना सांभाळा... अन्यथा 30 टक्के पगार कपात : जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे

अजित झळके
Sunday, 29 November 2020

काबाड कष्ट करून आई-वडिलांनी मुलांना शिकवायचं, शहाणं करायचं. नोकरीला लावायचं आणि पंखात बळ आल्यावर त्याच आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून मुलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवायची, अशी अनेक उदाहरणे आहेत.

सांगली : काबाड कष्ट करून आई-वडिलांनी मुलांना शिकवायचं, शहाणं करायचं. नोकरीला लावायचं आणि पंखात बळ आल्यावर त्याच आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून मुलांनी त्यांच्याकडे पाठ फिरवायची, अशी अनेक उदाहरणे आहेत. जिल्हा परिषदेतील कर्मचारी असलेली मुलं आपल्या आई-वडिलांन बाबत असे वागत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांना दणका देण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी आज घेतला आहे. अशा बेजबाबदार मुलांच्या पगारातून थेट 30 टक्के कपात करून ती रक्कम आई-वडिलांना दिली जाणार आहे. 

लातूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही योजना तातडीने लागू करण्याचा आदेश दिल्याचे सौ. कोरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. मुलगा नोकरी करतो. चांगला पगार मिळतो. शहरात राहतो. सुखवस्तू कुटुंब आहे. या वरवरच्या दिखाव्याच्या आड एक वेदनाही दडलेली असते. ही नोकरी, हे सुख ज्यांच्या कष्टामुळे आपल्याला गवसलं, त्या आई-वडिलांना विसरणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही. काहीजण त्यांना वृद्धाश्रमात सोडतात, तर काहीजण आहे त्या परिस्थितीत सोडून त्यांच्याकडे पाठ फिरवतात. हे दुखणं आई-वडिलांनी सांगायचं तर कोणाला? सांगून काही फायदा होणार आहे का? त्याबाबत काही कायदा आहे का? त्याची माहितीच बिचाऱ्यांना नसते. 

अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या उद्देशाने लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अलीकडेच हा नियम आपल्या जिल्ह्यात लागू केला. त्याच धर्तीवर प्राजक्ता कोरे यांनी सांगली जिल्हा परिषदेसाठी या नियमाची अंमलबजावणी होईल असे आदेश आज जारी केले. 

जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, पंचायत समितीकडील कर्मचारी, शिक्षक या सर्वांसाठी हा आदेश लागू असणार आहे. जिल्हा परिषदेकडे नोकरीस असलेला एखादा कर्मचारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसेल, जबाबदारी पार पडत नसेल; तर त्या आई-वडिलांनी थेट अध्यक्षांकडे तक्रार करायची आहे. त्या तक्रारीवर सुनावणी घेतली जाईल. त्यातून समोर आलेल्या वस्तुस्थितीच्या आधारावर पुढील निर्णय दिला जाईल. आई-वडिलांची तक्रार खरी असेल, तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून थेट 30 टक्के रक्कम कपात करून ती त्यांना दिली जाईल. 

न घाबरता थेट तक्रार करा

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कुटुंबाविषयी आपली संपूर्ण जबाबदारी पार पाडली पाहिजे. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे त्यांचे कर्तव्य तर आहेच. याबाबत त्यांच्या आई-वडिलांनी आमच्याकडे न घाबरता थेट तक्रार करावी. त्यांना न्याय दिला जाईल. सर्व कर्मचारी संघटनाही आमच्या या निर्णयाचे स्वागत करतील, असा आम्हाला विश्वास आहे. 
- प्राजक्ता कोरे, जि. प. अध्यक्षा 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of parents ... otherwise 30 percent salary cut; Sangali ZP President Prajakta Kore