कोविड रुग्णांसाठी आणखी कार्यालये-हॉल ताब्यात घ्या...पालकमंत्री पाटील : महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्‌घाटन 

जयसिंग कुंभार
Friday, 21 August 2020

सांगली-  कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी मंगल कार्यालये- हॉल ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार तसेच अलगीकरणासह सर्व वैद्यकीय उपचाराच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. महापालिकेच्यावतीने येथील कोल्हापूर रस्त्यावरील अदिसागर मंगल कार्यालय सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन झाले. 

सांगली-  कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी मंगल कार्यालये- हॉल ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार तसेच अलगीकरणासह सर्व वैद्यकीय उपचाराच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण कराव्यात अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केली. महापालिकेच्यावतीने येथील कोल्हापूर रस्त्यावरील अदिसागर मंगल कार्यालय सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन झाले. 

सुमारे 120 खाटांचे हे रुग्णालय उद्यापासून महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी मोफत उपलब्ध असेल. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांनीही ऑनलाईन या कार्यक्रमात सहभाग घेतला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितिन कापडणीस, राष्ट्रवादीचे गटनेते मैन्नुदीन बागवान, भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, कॉंग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर आदी यावेळी उपस्थित होते. 
पालकमंत्री पाटील म्हणाले,"" ही वेळ संकटाची आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मालेगाव-भिवंडीसारख्या गर्दीच्या शहरांमधील साथ आता आटोक्‍यात आली आहे. त्यांचे अनुकरण आपल्याकडेही केले पाहिजे.'' राज्यमंत्री कदम यांनी महापालिकेसाठी आवश्‍यक ती सर्व मदत राज्य शासन देईल असे आश्‍वासन दिले.

खासदार पाटील यांनी महापालिकेचे हे काम लोकोपयोगी असून या कामासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही असे सांगितले.जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले,"" महापालिकेने अल्पावधीत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आता आणखी एक हॉस्पिटल उभे करण्यासाठी कार्यवाही सुरु करावी. रुग्णांसाठी अन्यही सुविधा देण्यासाठी आवश्‍यक ती शासकीय मदतही दिली जाईल.'' 
आयुक्त कापडणीस म्हणाले,"" 120 पैकी 20 बेड संशयित कोविड रुग्णांसाठी असतील. सात दिवसात हॉस्पिटल उभे करण्यात आले. सर्व शंभर खाटांना ऑक्‍सिजन सुविधा असेल. चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी शहरातील सर्व फिजिशियन तयार आहेत.'' 

सुरेश आवटी यांची चौकशी 
कोरोनातून मुक्त होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ऑनलाईन चौकशी केली. पालकमंत्र्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. जयंत पाटील म्हणाले,"" सुरेशबापूंना पुण्याला नेल्याचे समजले आणि आमची चिंता वाढली. घोटाळा होतो की काय अशी भिती आम्हाला वाटली. पण बापूंनी कोरोनावर मात केली. आता ते जोमाने समाजसेवा सुरु करतील.'' जयंतरावांच्या या टिपणीवर श्री. आवटी यांच्यासह सर्वांनी हसून दाद दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take over more offices and halls for Kovid patients : Guardian Minister Patil