तारळे...पराक्रमी राजेमहाडिक घराण्याचे गाव

यशवंतदत्त बेंद्रे
बुधवार, 23 जानेवारी 2019

तारळे - मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजीचे कर्तबगार प्रशासक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई तारळ्याच्या हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम अनेकांना अवगत नाही. स्वराज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांचे आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे तारळ्याचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. 

तारळे - मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजीचे कर्तबगार प्रशासक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई तारळ्याच्या हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम अनेकांना अवगत नाही. स्वराज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांचे आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे तारळ्याचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. 

प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या तारळे व राजेमहाडिक घराण्याबद्दल कवींद्र परमानंदानी ‘शिवभारतात’ म्हटलेले आहे की, ‘महाडिक परशुराम दुजे सत्यकुली नवं !! ‘महामनी महाडिके फत्तेखानास गाठू दे !! अशा या परशुरामाप्रमाणे शूर महाडिक घराण्याचा स्वराज्याशी संबंध शहाजीराजांपासून आला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिकांनी मदत केली. परसोजींच्या सात मुलांपैकी हरजीराजेंना शिवाजी महाराजांनी आपली कन्या अंबिकाबाई देऊन सन १६६८ मध्ये सोयरीक केली. संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटकसह दक्षिण प्रांत औरंगजेबच्या झंझावाती आक्रमणापासून वाचविला.

त्यांनी त्यावेळी जिंजी, वेल्लोर, मद्रास, म्हैसूर, अर्काट, बंगळूर आदी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तमिळनाडू हरजीराजेंनी जिंजीच्या अधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९ मध्ये जिंजीस आले. त्यास राजधानी घोषित करून तेथूनच काही काळ राज्यकारभार केला.

संभाजी राजांच्यानंतर औरंगजेब हा मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. मात्र, हरजीराजे त्या आड आले. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजीराजेंनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला. ही त्यांची कामगिरी अद्वितीय व अनमोल अशीच आहे. हरजीराजेंचा मृत्यू १६८९ मध्ये झाला. हरजीराजेंचे पुत्र शंकराजीराजेंशी छत्रपती संभाजी महाराजांची मुलगी भवानीबाई यांचा झालेला विवाह राजेमहाडिक घराण्यात छत्रपतींची दुसरी सोयरीक ठरली. १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व शंकराजीराजे महाडिक यांना तारळे महालाअंतर्गत २४ गावे 
व ७२ वाड्यांची पाचही वतनांची सनद मिळाली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यास आले. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.

शंकराजीराजेंचे निधन सुमारे १७२८ च्या दरम्यान झाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या कन्या भवानीबाई यांनी सहगमन केले. राजेमहाडिक घराण्याच्या खासगी स्मशानभूमीत तारळी व काळगंगा नदीच्या संगमावर त्यांची असलेली समाधी आजही पाहता येते. 
ती पाहण्यासाठी लोकांची दिवसेंदिवस संख्या वाढतच आहे. अशा पराक्रमी राजेमहाडिक घराण्याचा इतिहास हा कधी उजेडात आलाच नाही. तारळ्यात या पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. आजही राजेमहाडिक बंधूंचे आठ वाडे दिमाखात उभे असून, त्यात आजची राजेमहाडिक पिढी नांदते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tarale Village History