esakal | तासगाव पालिका वार्तापत्र : निवडणुकीला आठ महिने; वातावरण निर्मिती सुरू

बोलून बातमी शोधा

Tasgaon Municipal Newsletter: Eight months to the election; The atmosphere begins to build}

तासगाव पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, राजकीय पक्षांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत.

तासगाव पालिका वार्तापत्र : निवडणुकीला आठ महिने; वातावरण निर्मिती सुरू
sakal_logo
By
रवींद्र माने

तासगाव : तासगाव पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, राजकीय पक्षांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप याशिवाय अन्य "शक्‍यतां'च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या निवडणुकीत भाजप समोर मोठे आव्हान उभे करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 

पालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना आणि आरक्षणे जरी निश्‍चित झाली नसली, तरी पक्षीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याची सुरवात भाजपने केली आहे. पदाधिकारी बदल आणि खासदार संजय पाटील यांनी सुरू केलेल्या वॉर्डभेटी यामुळे निवडणुकीला अजून आठ महिने अवकाश असला तरी वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. त्यांचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या शिवजयंती उत्सवामध्ये दिसून आले. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही हालचाल सुरू झाली असून, काही कारणाने राष्ट्रवादीपासून दुरावलेले व नाराज असलेल्यांना भेटण्याचा सपाटा युवा नेते रोहित पाटील यांनी लावला आहे. त्यामानाने राष्ट्रवादीची वाटचाल नेहमीप्रमाणे "आस्ते-कदम' अशी सुरू आहे. विरोधकांना आताच जागे न करण्याच्या भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसची असल्याचे दिसत आहे. शहरातील कॉंग्रेस पक्ष आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असते, तर निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता. तसे ते एकत्र येऊ नयेत यासाठी "विशेष' काळजी घेण्यात आली होती. यावेळीही एकत्र येऊ नयेत अशी आतापासूनच पावले पडताना दिसत आहेत. 

याशिवाय वेगळा पर्याय चालू शकतो का? याची चर्चाही सुरू आहे. मात्र मागील अनेक निवडणुकांचा अनुभव पहाता "एक फसलेला प्रयोग' अशा शब्दांत त्याचे वर्णन करावे लागेल. ज्यावेळी कॉंग्रेस वगळता कोणतेही ताकदीचे राजकीय पक्ष नव्हते, तेव्हा नेतृत्व शहरातील नेत्यांकडे होते. मात्र 1995 नंतर राजकारण बदलत गेले, गट आणि पक्षांचा प्रभाव वाढला. नगराध्यक्षपदाची संगीतखुर्ची सुरू झाली आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव ओसरला. प्रत्येक निवडणुकीच्या आधी अशा चर्चा सुरू होतात आणि विरून जातात. 

हम नही सुधरेंगे ! 
राष्ट्रीय महामार्गाखाली जाणाऱ्या शहराच्या पाण्याच्या पाईपलाईन जाण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष किंवा लाखो रुपये खर्च करून काहीही उपयोग नसताना ओढ्याच्या कडेला "नव्याने दिवे' लावण्याचा प्रकार असू दे. सत्ताधारी गटाकडून काहीही गांभीर्याने घेतले जाताना दिसत नाही. 

संपादन : युवराज यादव