तासगाव पालिका वार्तापत्र : जनता दरबारद्वारे साखरपेरणी सुरू

रवींद्र माने
Friday, 19 February 2021

तासगाव शहरातील नागरिकांना भेटण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करून खासदार संजय पाटील यांनी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साखरपेरणी सुरू केली आहे.

तासगाव (जि. सांगली) : तासगाव शहरातील नागरिकांना भेटण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करून खासदार संजय पाटील यांनी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साखरपेरणी सुरू केली आहे. तीच री ओढत पालिकेने सुमारे 90 कामांचे ठराव केल्याने "रिकामा खजिना पण आश्वासनांच्या खैराती' अशी चर्चा तासगावकर करू लागले आहेत.शहराचा माहोल आता निवडणुकीचा होऊ लागला आहे. सत्ताधारी भाजपमध्ये तर कधी एकदा निवडणूक होते इतका उत्साह आहे. आता केवळ "अब की बार...!' घोषणाच बाकी उरली आहे.

शहरात 313 (?) कोटींची कामे चार वर्षांत झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नुकतीच खासदार संजय पाटील यांनी निवडक 11 जणांची बैठक घेतल्याने त्यापैकी काहींना आपली उमेदवारी जाहीर झाल्याचा भास होऊ लागला आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी भाजपने प्रभाग निहाय नगरसेवक नियमित जनता दरबार घेण्याचे आश्वासन दिले होते. ते निवडणुकीपूर्वी आता पूर्ण केले जात आहे.

खुद्द खासदारांनी जनता दरबार सुरू करून अडचणी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र नागरिक मांडतील त्या समस्या दूर करण्याची जबाबदारी काकांचे पालिकेतील कारभारी किती पार पाडतात ? यावर उपक्रमाचे यश अवलंबून आहे. एकीकडे खासदारांकडून साखर पेरणी सुरू असताना पालिकेतील कारभाऱ्यांनी शेवटच्या टप्पात कामाचा धडाका लावण्याचे नियोजन केले आहे. 

पालिका सभेत 88 कामाचे ठराव करण्यात आले आहेत. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. अनामत रक्कम परत देण्यासही विलंब होत आहे. नगरपालिका फंडावरही उभा आडवा हात मारण्यात आला आहे. 
दलित वस्ती सुधार निधी आणि स्वच्छता अभियानाचे शिल्लक पैसे त्या त्या कामावरच खर्च करता येतात. शिल्लक तीन साडेतीन कोटींवर आणि येऊ घातलेल्या निधीवर केवळ "आश्वासनांची अक्षरशः खैरात' असेच या जंगी ठरावाबाबत म्हणता येईल. एकाच ठरावात सगळी कामे घुसडण्यात आली आहेत. 

19 लाखांची भिंत नंतर पाडणार 

ज्या शाळेच्या क्रीडांगणावर भुयारी गटार योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे त्या मैदानाला कंपाऊंड वॉलसाठी 19 लाख खर्च करण्यात आले आहेत. ही बांधलेली भिंत पुढील काम सुरू झाल्यावर पाडण्यात येणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon Municipal Newsletter: Sugar sowing started by Janata Darbar