esakal | तासगाव नगरपालिका वार्तापत्र : राष्ट्रवादीसमोर पक्ष उभारणीचे आव्हान

बोलून बातमी शोधा

Tasgaon Municipality Newsletter: The challenge of building a party before the NCP

तासगाव पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून भाजप आणि कॉंग्रेस कामाला लागल्याचे चित्र आहे; पण पालिकेत प्रमुख विरोधक असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस कोठे आहे? असा सवाल सामोर आहे

तासगाव नगरपालिका वार्तापत्र : राष्ट्रवादीसमोर पक्ष उभारणीचे आव्हान
sakal_logo
By
रवींद्र माने

तासगाव: तासगाव पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून भाजप आणि कॉंग्रेस कामाला लागल्याचे चित्र आहे; पण पालिकेत प्रमुख विरोधक असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस कोठे आहे? असा सवाल सामोर आहे. एक नेता नाही... पालिकेत कोणतेही काम नाही... अशा अवस्थेत असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस आगामी पालिका निवडणुकीचे आव्हान कशी पेलणार? याची चिंता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतदारांना लागली आहे. 


एकेकाळी पंधरा वर्षे पालिकेत एक हाती सत्ता असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठे आहे? हा प्रश्न सध्या तासगावकरांना पडला आहे. मागील निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस आज बरीच बॅकफुटवर केली आहे. शहरात पक्षाला नेतृत्व नाही, कोणताही ठोस कार्यक्रम नाही,

तसेच पालिकेत गेल्या पाच वर्षातील काम पाहता, प्रगती पुस्तकावर लाल शेरा असलेल्या राष्ट्रवादीसमोर येत्या सात-आठ महिन्यांत निवडणुकीला सामोरे जाण्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे. पाच वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला केवळ 270 मते; तर सरासरी प्रभागात अवघ्या 140 मतांनी पराभव झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता नव्या आत्मविश्वासाची आवश्‍यकता आहे. 


आर. आर. आबांनंतर राष्ट्रवादी संपली, असे वाटत असताना मागील निवडणुकीत तासगावकर मतदारांनी भरभरून मते दिली. आबांनंतर आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढताना काही चुका टाळल्या असत्या, तर आज पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता दिसली असती. याशिवाय गेल्या पाच वर्षांत विरोधक या नात्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना चमकदार कामगिरी करता आली नाही.

आता पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्या नव्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना अजूनही पक्ष केवळ चर्चा आणि चर्चा यामध्येच गुरफटलेला दिसत आहे. त्यातून बाहेर पडण्याचे आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. 


पक्ष एकसंध करण्याचे आव्हान 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला शहरात मरगळ आली आहे. दोन गटांत विभागलेल्या पक्षाला एकसंध करण्याचे आव्हान रोहित पाटील यांच्यासमोर आहे. तालुक्‍यात नवे युवा मतदार रोहित पाटील यांच्याबरोबर असले, तरी शहरात तशी बांधणी झालेली दिसत नाही. आर. आर. आबांनंतर अनेकजण भाजपकडे वळले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात आणणे ही खरी कसोटी आहे. 

संपादन : युवराज यादव