तासगावचा रथोत्सव 450 वर्षात तिसऱ्यांदा रद्द

रवींद्र माने 
Tuesday, 18 August 2020

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तासगाव गणपती संस्थानच्या श्री गणपतीचा गेली 240 वर्षांची असलेला रथोत्सव यावर्षी कोरोनामुळे होणार नसल्याचे स्पष्ट झाले. 240 वर्षात हा तिसऱ्यांदा रथोत्सव रद्द होणार आहे. 

तासगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तासगाव गणपती संस्थानच्या श्री गणपतीचा गेली 240 वर्षांची असलेला रथोत्सव यावर्षी कोरोनामुळे होणार नसल्याचे स्पष्ट झाले. 240 वर्षात हा तिसऱ्यांदा रथोत्सव रद्द होणार आहे. 
तासगावच्या श्री गणपतीचा रथोत्सव हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान ! तासगावच्या उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे श्री सिद्धीविनायकाची प्रतिषस्थापना मराठा साम्राज्याचे शेवटचे सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. 1779 मध्ये केली. गणपतीची प्रतिष्ठापना करत असताना श्रींचे भाविकांशी असलेले नाते केवळ धार्मिक न रहाता, भक्त आणि श्री यांच्यातील अंतर कमी व्हावे या हेतूने दक्षिण भारतातील रथयात्रेची कल्पना परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुरू केली.

दरवर्षी ऋषी पंचमीला तीन मजली लोखंडी सांगाडा असलेला आणि त्यावर लाकडी कोरीवकाम केलेला असा रथ भक्त आपल्या हातानी ओढून नेतात. रथामध्ये पंचधातूंची पचवीस किलो वजनाची श्रींची मूर्ती ठेवलेली असते. गणपती मंदिरापासून समोर असलेल्या श्री काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढला जातो. श्री आपल्या वडिलांच्या भेटीला जातात असे मानले जाते. रथामध्ये पटवर्धन घराण्यातील श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या समवेत विविध जातीचे मानकरी बसलेले असतात. तेथे आरती करून पुन्हा रथयात्रा माघारी फिरते.

ही रथयात्रा गणेशभक्तांचे आकर्षण असते लाखो भाविक यावेळी जमतात आणि रथ ओढतात. ही परंपरा गेली 240 वर्षे पाळली जाते. यावर्षीचा रथोत्सव हा 241 वा आहे. मात्र, यावर्षी हा रथोत्सव रद्द करण्यात आल्याचे गणपती पंचायतीचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन आणि डॉ. आदिती पटवर्धन यांनी जाहीर केले आहे. यादिवशी उत्सवमूर्ती दरवर्षीप्रमाणे काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत रथातून न नेता गाडीतून नेऊन परत मंदिरात आणण्यात येणार आहे. असे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon's chariot festival canceled for the third time in 450 years