गुरुजी, मुलांकडून पांडोझरीत व्यसनमुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher and student rally awareness campign addiction free jat sangli

गुरुजी, मुलांकडून पांडोझरीत व्यसनमुक्ती

जत : गुरुजींच्या सांगण्यावरून मुलांनी हट्ट धरला आणि पालक व्यसनमुक्त झाले. हे शक्य झाले आहे, तालुक्यातील पांडोझरी गावात. येथील पालकांनी मुलांच्या सांगण्यावरून दारू, तंबाखू अशा व्यसनांना कायमची सोडचिठ्ठी दिली. मुलांनी घडवलेली ही व्यसनमुक्ती व्यापक परिवर्तन घडवणारी ठरली. आपल्या वडिलांना व्यसनमुक्त करणाऱ्या मुलांनी आपणही व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, याचा धडाच शाळेत गिरविला आहे. दुष्काळी जत तालुक्याच्या कर्नाटक सीमेवरील हे गाव. दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि व्यसने यांचा परस्पर संबंध आहे. जत तालुक्यातील गावोगाव हा संबंध सतत दिसून येतो.

पांडोझरी गाव अवघ्या तीन-साडेतीनशे कुटुंबांचे. दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण, रोजगाराचा अभाव, शिक्षणाची रड, रोजगारासाठी कुटुंबाची ऊसतोड, मजुरांचे स्थलांतर हे सारे गावच्या पाचवीला पुजलेले. या गावातील बाबर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेने या चित्रात बदलासाठी बीज पेरले. या व्यसनमुक्तीत केलेल्या अनेक उपक्रमांचा फेब्रुवारी २०२० मध्ये गौरव झाला.

चाळीस विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, तर शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांचा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासन, सलाम मुंबई फाउंडेशन आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्यभरातील अशा उपक्रमशील शाळांचा गौरव केला होता. वरकरणी गेल्या दोन वर्षांचे हे प्रयत्न असले तरी शाळेतील शिक्षकांनी २०१० पासून यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. आता जवळपास १२ वर्षांच्या तपश्‍चर्येला चांगली फळे येत आहेत. गावातील दारू पिणाऱ्यांचे प्रमाण शुन्यावर आले. महिलांची मिश्री बंद झाली आहे. अगदी तंबाखूचा बार भरणारी पुरुष मंडळीही आता दिसत नाही. कष्टकरी गरीब कुटुंबात झालेला हा बदल खूप महत्त्वाचा आहे. याचे सर्व श्रेय शाळेतील शिक्षक आणि विद्या‍र्थ्यांना आहे.

शिक्षक दिलीप वाघमारे व्यक्तिगत पातळीवर व्यसनमुक्तीसाठी लोकांना भेटायचे, तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, शासनाच्या मूल्यवर्धन यशोकथा योजना आली. त्या माध्यमातून निरोगी आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तंबाखू, गुटखा, दारू यासारखी सवय शरीरासाठी हानिकारक आहेत, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाचा भाग म्हणून दिली आणि तेवढ्यावरच न थांबता हा संदेश तुम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत द्या, असा आग्रह धरला. गुरुजीच सांगतात म्हटल्यावर मुलांनी घरी पालकांचा मार खाऊन, रुसवा धरून आई-वडिलांना हे करायला भाग पाडले. गेल्या वर्षीपासून पांडोझरी गावातील पंचमंडळींनी मनावर घेत व्यसनमुक्तीची मोहीम हाती घेतली. गेली दोन वर्षे व्यसनमुक्तीची चळवळ अखंडपणे सुरू आहे. त्याची धुरा विद्यार्थ्यांकडे आहे. पालकांनी सांगितले म्हणून ४० कुटुंबे पूर्ण व्यसनमुक्त झाली आहेत. यातून व्यसनमुक्त मोहिमेची दिशा कशी असावी, याचा धडाच दिला जातो आहे.

मुलं सांगतात म्हटल्यावर आई-वडिलांमध्ये चांगले बदल होतात. दोन वर्षांत व्यसनमुक्तीमुळे अनेक कुटुंबांत झालेले बदल आशादायी आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या आई-वडिलांमध्ये बदल घडविणारी ही मुले पुढे स्वतःच्या आणि व्यक्तिगत आयुष्यातही चांगले बदल घडवतील, अशी खात्री वाटते.

- दिलीप वाघमारे, शिक्षक