कोरोना बाधित सर्वेक्षणाची गती वाढविण्यासाठी शिक्षकही सहभागी 

अजित झळके 
Thursday, 10 September 2020

कोरोना बाधित रुग्णांच्या सर्वेक्षणाची गती वाढविण्यासाठी या मोहिमेत शिक्षकांना सहभागी करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

सांगली : कोरोना बाधित रुग्णांच्या सर्वेक्षणाची गती वाढविण्यासाठी या मोहिमेत शिक्षकांना सहभागी करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांना आदेश जारी करीत आजपासूनच ही प्रक्रिया सुरु करण्यात सांगितले आहे. या कामी सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांनी कार्यरत व्हावे, असे पत्रात म्हटले आहे.
 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा टप्पा समूह संसर्गाचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या काळात संपर्क यादी तयार करणे जवळपास अशक्‍य आहे. अशावेळी रुग्णाच्या कुटुंबातील लोक, त्या गल्लीतील लोक आणि सरसकट पन्नास वर्षावरील लोक, अन्य व्याधीग्रस्त यांची यादी करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. 

ही मोहिम संथगतीने सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात शिक्षकांनाही सहभागी करून घेण्याचे आदेश देण्यात आले. ही जबाबदारी केंद्रप्रमुखांवर सोपवली गेली आहे. प्राथमिक केंद्राशी संलग्न गावातून त्याचे नियोजन करावे, आरोग्य यंत्रणेच्या पथकासोबत शिक्षकांनी सहभागी व्हावे, दररोज किमान पन्नास जणांचा सर्व्हे करावा, असे आदेशात नमूद आहे. त्यात मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ शिक्षकांबाबत थेट कोणताच उल्लेख नसल्याने गोंधळ उडाला होता. 

केंद्र शासनाने 55 वर्षावरील शासकीय कर्मचाऱ्यांना कोविडचे काम देऊ नये, असे जाहीर केले आहे. पन्नाशीवरील रुग्णांना कोविड झाल्यास धोका अधिक आहे, असे निष्कर्ष आहेत. त्यासाठीचा हा सर्व्हे होतोय. त्यामुळे त्यांना वगळावे, अशी मागणी पुढे आली आहे. 

पन्नाशीवरील शिक्षक वगळले 
पन्नास वर्षावरील वयोगटातील कोरोना रुग्णांन कोरोनाचा धोका आहे म्हणून त्यांचा शोध घेतला जाणार असेल तर त्यासाठी पन्नास वर्षावरील शिक्षकांची नियुक्ती कशी योग्य ठरू शकते असा सवाल सीईओ जितेंद्र डुडी यांना केला असता त्यांनी तत्काळ शिक्षकांची अडचण समजून घेत पन्नास वर्षावरील शिक्षकांना या कामातून वगळण्याचे आदेश तातडीने देतो, असे "सकाळ'ला सांगितले. तसे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले जातील असेही स्पष्ट केले. डुडी यांच्या भूमिकेचे ज्येष्ठ शिक्षकांनी स्वागत केले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers also participated to speed up the corona disruption survey