esakal | शिक्षकदिन विशेष : ऑनलाईन तासांमुळे मुलं झाली धाडसी अन्‌ तंत्रस्नेही
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher's Day Special: Children became brave and tech-savvy by online class

कोरोना आपत्तीच्या काळात सध्या शहरांबरोबरच खेड्यातील मुलेही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.

शिक्षकदिन विशेष : ऑनलाईन तासांमुळे मुलं झाली धाडसी अन्‌ तंत्रस्नेही

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

कोरोना आपत्तीच्या काळात सध्या शहरांबरोबरच खेड्यातील मुलेही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. जिल्हा परिषद व सरकारी अनुदानीत शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी हे तंत्र अवगत करीत अडचणीवर मात करीत हा किल्ला लढवला. त्यांचे हे अनुभव आजच्या शिक्षक दिनानिमित्त... 
 

"गल्ली मित्र' चा लाभ 

अडचणीवर मात करीत आता वेब कॅमेरा, लॅपटॉपसह स्क्रीनचा वापर करून अध्यापन सुरु असून 220 पैकी 209 मुले ऑनलाईन अध्यापनात सहभागी होतात. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी काही क्‍लृप्त्या कराव्या लागतात. जसे की प्रार्थना, काही शैक्षणिक कार्टुन्स दाखवावी लागतात. अधिकाधिक सोपेपणा, रोजच उजळणी घ्यावी लागते. मोबाईल नसलेल्यांसाठी आम्ही गल्लीतील एखाद्या दादाला विनंती करून मोबाईल मुलाला उपलब्ध करून दिला. या गल्लीमित्र उपक्रमातून आमची 39 मुले शिकत आहेत. या आपत्तीत अध्यापनाचा नवा मार्ग खुला झाला याचा अधिक आनंद आहे. 

- तारीश अत्तार, जि. प. शाळा, खरशिंग 

ऑनलाईन प्रशस्तीपत्र 

साधारण अडीच महिन्यांच्या कालावधीत मुलांत मला खुप सकारात्मक बदल जाणवले. अभ्यासात गोडी वाढली. एकाग्रता वाढली. नवी तंत्रज्ञान त्यांनी इतक्‍या सहजतेने स्विकारलं, की भविष्यात थेट अध्यापनात त्याचा नक्की खूप फायदा होईल. मी दर शनिवारी ऑनलाईन चाचणी घेतो आणि मुलांना थेट ऑनलाईन प्रशस्तीपत्रही देतो. त्याचा मुलांना होणारा आनंद अवर्णनीय आहे. मला भेटण्यासाठी मुलांमधील आतुरता कामाची प्रेरणा देते. 

- प्रमोद हेंबाडे, वसंत प्राथमिक, सांगली 

पालकांचाही सहभाग 

माझ्या शाळेत मुलांचे बहुतांश पालक कुपवाड एमआयडीसीतील कामगार आहेत. त्यांच्या ड्युटीच्या वेळा पाहूनच मला रोज माझ्या अध्यापनाची वेळ बदलावी लागते. कधी कधी मेसेज आणि व्हिडिओ टाकून मुलांना शिकवावे लागते. गरीबांच्या मुलांसाठी हे शिक्षण खूपच त्रासदायक आहे. मला एक चांगला बदल हा जाणवला तो म्हणजे मुलं शिक्षकाचे-वर्गाचे दडपण विसरून अध्यापनात सहभागी होतात. शंका धाडसाने विचारतात. पालकांचा अध्यापनातील सहभाग वाढला. 

- चंद्रकांत कांबळे, जि. प. शाळा, बामणोली 

शिक्षकही बदलले 

रोज दीड तास अध्यापन असते. मुल आणि पालक दोघांचाही अध्यापनात सहभाग वाढला. मुलं धाडसी झाली. शिकण्याचा आनंद घेऊ लागली. ती तंत्रस्नेही झाली. ही ऑनलाईन शिक्षणाची मोठी उपलब्धी आहे. शिक्षकाला पुर्ण तयारीसह उतरावे लागले. पाश्‍चात्य देशाप्रमाणेच यापुढे आपल्याकडेही ऑनलाईन शिक्षणाचा अंतर्भाव यापुढे नक्की वाढेल. शिक्षकांतही गुणात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे शिक्षक नियमित शाळा सुरु झाल्यानंतरही ऑनलाईनचा उपयोग करून शिकवतील. पालकांशी संवाद ठेवतील. 

- विजय कुलकर्णी, बापट बाल विद्यामंदिर, सांगली

संपादन : युवराज यादव

loading image
go to top