
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थित राहण्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश असताना जत तालुक्यातील अनेक शिक्षक शाळेत हजरच राहात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी शासनाच्या व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
उमदी : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थित राहण्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश असताना जत तालुक्यातील अनेक शिक्षक शाळेत हजरच राहात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी शासनाच्या व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
अनेक शिक्षक शाळेला कुलूप लावून गावात फिरतानाचे चित्र पहावयास मिळते आहे.
सरकार राज्यात माध्यमिक नंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या विचारात आहे. 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे विचार करून प्राथमिक शिक्षकांना आपल्या शाळेत 50 टक्के कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे आदेश सर्व शाळेंना देण्यात आले आहे. पण जत तालुक्यातील अनेक शिक्षकांनी या आदेशाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. ज्या ठिकाणी 50 टक्के शिक्षक उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्या ठिकाणी शाळेला कुलूप लावून शिक्षक दांडी मारत आहेत.
ज्याप्रमाणे माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले गेले त्याप्रमाणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण देण्यात यावेत असेही सुचविण्यात आले होते. मात्र यावरही प्राथमिक शिक्षकांनी गंभीरता दाखवलेली नाही. अनेक शाळेत शिक्षकांनी पहिल्या दिवसाची हजेरी तरी लावली आहे का याबाबत साशंकता आहे. फक्त शाळेचे रेशन आल्यावर वितरणासाठी हजेरी लावली जाते. त्यानंतर मात्र शाळेला कुलूप असते. त्यामुळे पालक वर्ग मात्र आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंतीत आहेत.
शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाचे आहेत. शाळेत शिक्षकांनी हजर असले पाहिजे. झेडपी शाळेतील गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- आर. डी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी
संपादन : प्रफुल्ल सुतार