esakal | शिक्षकांची पायी दिंडी आज होणार बारामतीत दाखल; पवारांना भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers' procession will reach Baramati today; I will meet Pawar

विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने सुरू असलेल्या "सांगली ते बारामती' पायी दिंडी काढणाऱ्या शिक्षकांची राज्यकर्ते व शिक्षक आमदारांनी साधी दखल घेतली नाही..

शिक्षकांची पायी दिंडी आज होणार बारामतीत दाखल; पवारांना भेटणार

sakal_logo
By
दिलीप क्षीरसागर

कामेरी (जि . सांगली ) ः विनाअनुदानित शाळांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने सुरू असलेल्या "सांगली ते बारामती' पायी दिंडी काढणाऱ्या शिक्षकांची राज्यकर्ते व शिक्षक आमदारांनी साधी दखल घेतली नाही, अशी खंत संघटनेचे सांगली जिल्हा सचिव प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले,""संघटनेच्यावतीने आजवर 162 आंदोलने झाली आहेत. आजअखेर संघर्ष सुरूच आहे. दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनी आंदोलनामुळे घर सोडून बाहेर आहोत. संपूर्ण राज्यात 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचा प्रतिकात्मक काळा वाढदिवस करण्यात आला. 

राज्यात कोरोनाची महामारी असतानादेखील आम्ही जीवावर उदार होऊन 1 सप्टेंबर 2020 पासून पायी दिंडी काढली आहे. आजचा पाचवा दिवस. शिक्षक दिनी तरी आमची कोणी विचारपूस करेल वाटले होते पण तसे झाले नाही. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आजवरचा इतिहास आहे, की जे कुणी दारात गाऱ्हाणे मांडण्यास गेले त्यांना रिकाम्या हाती परत पाठवले नाही. उद्या (ता. 7) दिंडी बारामतीत पोहचेल. न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. हिमेत राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, वैजनाथ चाटे, प्रविण पारसे, पी. आर. पाटील, सावता माळी, एस. पी. पाटील, किरण नाईक, उत्तम जाधव, संतोष जत्ते, प्रमोद पाटील, विलास खांडेकर, प्रेमचंद शिंदे सहभागी आहेत. आता माघार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

सुप्रिया सुळेंकडून दखल 
सांगली ते बारामती पायी दिंडी काढणाऱ्या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली. दूरध्वनीवरून त्यांनी आस्थेने चौकशी केली. पवार साहेबांना सविस्तर माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. असे जरी असले तरी खासदार शरद पवार यांना भेटल्याशिवाय आम्ही परतणार नाही, असे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी "सकाळ' ला सांगितले. पायी दिंडीतील कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटणार होतो. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सुळे यांना त्याची कल्पना दिली.

संपादन : युवराज यादव