अदृश्य राक्षसाविरोधात लढताहेत नगरचे हे 45 हिरो 

सूर्यकांत वरकड
गुरुवार, 26 मार्च 2020

रुग्णाचा तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यास त्याला तत्काळ बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात येते. "निगेटिव्ह' अहवाल असल्यास रुग्णाला 14 दिवस "होम क्वारंटाईन'चा सल्ला दिला जातो. त्या रुग्णावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असतो. 

नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चार विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. जिल्हा रुग्णालयात दोन आणि अन्य दोन रुग्णालयांतील दोन कक्षांचा त्यांत समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील 45 डॉक्‍टर आणि 55 परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची टीम मेहनत घेत आहे. 

कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आल्यास रुग्णाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात भरती केले जात आहे. रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले जातात. ते पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. 12 ते 24 तासांत त्यांचा अहवाल येतो. तोपर्यंत रुग्णाला जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यासाठी दोन कक्ष केले आहेत. परदेशातून आलेल्या, सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. परदेशात गेलेला नाही अथवा कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. हे दोन्ही कक्ष जिल्हा रुग्णालयापासून वेगळे आहेत. 

रुग्णाचा तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यास त्याला तत्काळ बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात येते. "निगेटिव्ह' अहवाल असल्यास रुग्णाला 14 दिवस "होम क्वारंटाईन'चा सल्ला दिला जातो. त्या रुग्णावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असतो. 

"पॉझिटिव्ह' आढळून आलेल्या रुग्णांचे, 14 दिवसांनतर घशातील स्रावाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घेतले जातात. त्याचा अहवाल "निगेटिव्ह' आल्यास पुन्हा 24 तासांनी स्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. दोन अहवाल "निगेटिव्ह' आल्यास त्याच्या हातावर "होम क्वारंटाईन'चा शिक्का मारून घरी पाठविले जाते. मात्र, पुन्हा 14 दिवस त्याने घरीच राहण्याच्या सूचना केल्या जातात. त्यावरही आरोग्य विभागाचे लक्ष राहते. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये असलेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

जेवण व नाश्‍त्याची व्यवस्था 
जिल्हा रुग्णालयासह अन्य ठिकाणी उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. रुग्णास वेळेवर जेवण व नाश्‍ता दिला जातो. शिवाय, डॉक्‍टर व अन्य कर्मचाऱ्यांचीही जेवणाची व्यवस्था केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाजीपाला, दूध, बॅंकाही सुरू राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी तेथे जास्त गर्दी करू नये. गर्दीमुळे हा आजार वाढण्याची दाट शक्‍यता असते. घरी थांबा, गर्दी टाळा. 
- डॉ. बापूसाहेब गाढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A team of 45 doctors to fight against Corona