टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचले पाहिजे...

हिरालाल तांबोळी 
Saturday, 12 September 2020

टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचले पाहिजे. घाटमाथ्यावरील सर्व क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे. वर्षातून तीन आवर्तने झाली पाहिजेत. योजनेचा फेरसर्व्हे झाला पाहिजे. या मागण्या त्वरीत पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 

घाटनांद्रे : टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचले पाहिजे. घाटमाथ्यावरील सर्व क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे. वर्षातून तीन आवर्तने झाली पाहिजेत. योजनेचा फेरसर्व्हे झाला पाहिजे. या मागण्या त्वरीत पूर्ण झाल्या पाहिजेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. 
असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे. घाटमाथ्यावरील सरपंच, उपसरपंच यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

शिंदे पुढे म्हणाले "घाटनांद्रेचा पूर्वभाग वगळता टेंभू योजनेचे काम सद्या बंद आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाईप उकरुन टाकल्याने त्यांना शेतात पीक घेता येत नाही. टेंभू योजनेचा तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, शेळकेवाडी, कुंडलापूर, जाखापुर, केरेवाडी, रायवाडी आदी गावास लाभ मिळणे आवश्‍यक आहे. मात्र यातून कुंडलापूर, वाघोली, गर्जेवाडी, शेळकेवाडीचा काही भाग वगळण्यात आला आहे.

ऑगस्ट अखेर योजनेचे काम पूर्णत्वास येईल. आतापर्यंत 50 टक्के निधी खर्च झाला आहे. 100 एकरावर चेंबर बसवण्यात येईल असे योजनेच्या संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आजही काम बंद अवस्थेत आहे. 

या मागण्या बाबतचे लेखी निवेदन जलसंपदा मंत्री,ग्रामीण विकास मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. त्यांचेकडूनही याची दखल घेण्यात आली नाही. एकंदर या योजनेपासून घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते आहे. टेंभू योजनेचे काम त्वरित सुरु करावे,वगळलेल्या गावांचा फेरसर्व्हे करुन समावेश करावा आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. यावेळी प्रल्हाद हाक्के, सुरेश गायकवाड, अनिता शिंदे, पोपट गिड्डे, शिवाजी बोराडे, चंद्रकांत जगदाळे, कैलास साळुंखे मच्छिंद्र पाटील, शंकर शिंगाडे उपस्थित होते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tembhu water should reach farmers' dams ...