सांगली महापालिका इमारतीच्या निविदेस मान्यता; स्थायी सभेत निर्णय

बलराज पवार
Saturday, 6 February 2021

मिरज रोडवरील विजयनगर येथे महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालय इमारतीसाठी 35 कोटींच्या निविदा काढण्यास स्थायी समितीच्या सभेत आज मान्यता देण्यात आली.

सांगली : मिरज रोडवरील विजयनगर येथे महापालिकेच्या प्रस्तावित मुख्यालय इमारतीसाठी 35 कोटींच्या निविदा काढण्यास स्थायी समितीच्या सभेत आज मान्यता देण्यात आली. तळमजल्यासह पाच मजल्यांची ही इमारत तीन वर्षांत स्वनिधीतून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी दिली. 

स्थायी समितीच्या आजच्या सभेत सदस्यांनी एकमताने हा विषय मंजूर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एक लाख 20 हजार चौरस फूट जागेत इमारतीचे बांधकाम होणार आहे. पर्यावरण अनुपालन करून आराखडे तयार करण्यात आले आहेत. यात 125 नगरसेवकांची महासभेसाठी बैठक व्यवस्था असेल. अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असेल; तर पत्रकार, नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र बाल्कनीची व्यवस्था आहे. 

500 ते 550 अधिकारी-कर्मचारी या ठिकाणी असतील. इमारतीला चार लिफ्ट असणार आहेत. भूकंप रोधक आरसीसी सांगाडा व छतासाठी स्लॅब तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. दोन स्वतंत्र प्रवेशद्वार, तसेच नागरिक, कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशिका ठेवली आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्पची व्यवस्था आहे. वीज बचतीसाठी भरपूर प्रकाश व नैसर्गिक हवा येईल अशी रचना करण्यात आली आहे. सौरऊर्जा संच, दिशादर्शक फलक असणार आहेत. 

शिवरायांचा पुतळा उभारा 
कॉंग्रेसचे नगरसेवक करण जामदार यांनी विजयनगर येथे होणाऱ्या महापालिकेच्या नूतन मुख्यालयाच्या इमारतीसमोरच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांना दिले. 

फायर ऑडिटचा अहवाल द्या 
भाजपच्या सदस्या सविता मदने यांनी भंडाऱ्यातील हॉस्पिटलमधील दुर्घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली होती. ते ऑडिट झाले आहे. मात्र त्याचा अहवाल देण्याची मागणी त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी फायर ऑडिटमध्ये हॉस्पिटलमध्ये त्रुटी आढळल्याचे मान्य करून, दुरुस्ती करून घेतो असे आश्‍वासन दिल्याचे सौ. मदने यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tender approval of Sangli Municipal Corporation building; Decisions in the Standing Committee